‘आदित्य ठाकरेंना अटक करा’; पूर्णेकर हत्याकांडात मीनाक्षी शिंदेंचा थेट पलटवार


ठाणे : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं असताना माजी महापौर मीनाक्षी शिंदे पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन समोर आल्या. आपल्यावर करण्यात येणारे आरोप राजकीय हेतूने होत असल्याचा दावा करत त्यांनी थेट आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “आधी आदित्य ठाकरेंना अटक करा,” अशी मागणी त्यांनी दिशा सालियन प्रकरणाचा संदर्भ देत केली.

मीनाक्षी शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या एफआयआरमध्ये त्यांचं नाव नव्हतं. मात्र, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाण्यात आल्यानंतर आपलं नाव एफआयआरमध्ये टाकण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला. “मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलं जात आहे,” असा घणाघातही त्यांनी केला. शिंदे गटातील कार्यकर्त्यांना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

दिशा सालियन प्रकरणावर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पुरावे नष्ट करण्यात आले असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे, असं म्हटलं. आदित्य ठाकरे यांचीही चौकशी करून त्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, हे आरोप असल्याचं आणि त्याबाबतचा तपास संबंधित यंत्रणांकडून होणं बाकी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

पूर्णेकर यांच्या मुलाने केलेल्या आरोपांवरही शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. मुलगा लहान असून त्याला हाताशी धरून बोलवलं जात असल्याचा दावा त्यांनी केला. “केवळ आरोप करून चालत नाही, ठोस पुरावे द्यावे लागतात,” असं त्या म्हणाल्या. आरोपींसोबतचे फोटो असल्याने आपले आरोपींशी संबंध सिद्ध होत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

व्हायरल ऑडिओ क्लिपबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. संबंधित ऑडिओ ‘एआय’च्या माध्यमातून तयार करण्यात आल्याचा दावा करत, याआधीच याबाबत तक्रार केल्याचं त्या म्हणाल्या. पूर्णेकर कुटुंबीयांना भेटायला का गेल्या नाहीत, यावर बोलताना त्यांच्या नेत्यांवर सोशल मीडियावर टीका होत असल्याचं कारण त्यांनी दिलं. “पूर्णेकर यांची हत्या का झाली, हे मी सांगू शकत नाही. पोलिस तपासातून सत्य समोर येईल,” असंही मीनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केलं. चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!