बॉलीवूड गायक अरिजित सिंग महेंद्र सिंग धोनीसमोर नतमस्तक…!
अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीगचे १६ वे पर्व शुक्रवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर जवळपास एक लाख लोकांच्या साक्षीने दणक्यात सुरू झाले. कोरोना निर्बंधानंतर प्रथमच डोळे दीपविणारा शानदार सोहळा आयोजित करण्यात आला.
‘बॉलीवूड तडका’ सोबतीला असल्यामुळे दीड तासाच्या कार्यक्रमामुळे चाहते मंत्रमुग्ध झाले.
उद्घाटन सोहळ्याला प्रसिद्ध गायक अरिजित सिंग, देशातील युवा चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी ‘पुष्पा’ फेम रश्मिका मंधाना आणि ‘बाहुबली’फेम तमन्ना भाटिया यांची उपस्थिती होती. मात्र, यादरम्यान अरिजित सिंगने असे काही केले ज्यामुळे त्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हीडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एम. एस. धोनी स्टेजवर अरिजितजवळ पोहोचला तेव्हा त्याने धोनीच्या पायांना स्पर्श करून करोडो मने जिंकली.
अरिजित सिंग एम. एस. धोनीच्या पायाला हात लावेल असे कोणालाही वाटले नव्हते पण त्याने तसे केले. यानंतर धोनीनेही अरिजितला उचलून मिठी मारली. त्याच्या या सुंदर हावभावाचा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.