रंगांमुळे तुमचे कपडे खराब होण्याची भीती वाटतेय? काळजी करू नका, जाणून घ्या, कपडे नवीन करण्याची सोप्पी पद्धत..

पुणे : आज ३ मार्चला धुलिवंदन साजरे केले जात आहे. मात्र यंदाची होळी खगोलशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत विशेष ठरणार आहे. अनेक लोक सध्या रंगात न्हाऊन निघाले आहेत. होळी आणि रंगपंचमीचा सण म्हटला की रंगांची उधळण आलीच, पण कधी कधी हीच रंगाची उधळ आपल्या चिंतेचा भाग होऊन जाते.

काही वेळा आपले आवडते कपडे पूर्णपणे रंगाने माखतात. काही वेळा तर महागडे टी-शर्ट किंवा कुर्ते रंगांच्या डागांमुळे फेकून द्यावे लागतात. तुम्हालाही जर याच गोष्टींची भीती सतावत असेल तर अजिबात घाबरु नका. कारण तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील काही साध्या गोष्टी वापरून हे रंगाचे डाग सहज घालवू शकता.
पांढरे व्हिनेगर आणि लिक्विड सोप…
जर तुमच्या कपड्यावर पक्का रंग लागला असेल, तर व्हिनेगर हा रामबाण उपाय आहे. एका बादलीत थंड पाणी घेऊन त्यात अर्धा कप पांढरे व्हिनेगर आणि दोन चमचे लिक्विड डिटर्जंट टाका. कपडा किमान २ ते ३ तास त्यात भिजत ठेवा. व्हिनेगरमुळे कापड्यांवर लागलेले रंग लगेचच निघतात.

नॉन-जेल टूथपेस्ट…
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण साधी पांढरी टूथपेस्ट रंगाचे डाग काढण्यास मदत करते. तुमच्या ज्या कपड्यावर रंगाचा डाग पडला आहे, त्या ठिकाणी थोडी टूथपेस्ट लावा. यानंतर ती सुकेपर्यंत थांबा. त्यानंतर डिटर्जंट वापरून कपडा धुवा. यामुळे डाग पूर्णपणे जाण्यास मदत होते.
अल्कोहोल किंवा सॅनिटायझर…
आजकाल प्रत्येकाकडे सॅनिटायझर असतेच. सॅनिटायझरमधील अल्कोहोल रंगाला विरघळवण्याचे काम करते. तुमच्या कपड्यावर लागलेल्या डागावर थोडे सॅनिटायझर टाका आणि कापसाने तो भाग टॅप करा. रंग कापसाला चिकटले आणि तुमचा कपड्यावरील रंग आपोआप निघून जाईल.
लिंबू आणि मिठाचा वापर…
लिंबू हे नैसर्गिक आम्लयुक्त असल्याने डाग काढण्यासाठी उत्तम मानले जाते. तुमच्या कपड्यार डाग पडलेल्या भागावर अर्धे लिंबू कापून त्यावर थोडे मीठ टाका आणि हलक्या हाताने घासा. १५ मिनिटे तसेच ठेवून द्या. लिंबामुळे रंगातील रासायनिक घटक कमी होतात. ज्यामुळे डाग लवकर निघतात.
बेकिंग सोडा आणि पाणी…
पांढऱ्या किंवा फिक्कट रंगाच्या कपड्यांसाठी बेकिंग सोडा अत्यंत प्रभावी ठरतो. बेकिंग सोड्यामध्ये थोडे पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागावर लावा आणि सुकू द्या. सुकल्यानंतर जुन्या टूथब्रशने घासून कोमट पाण्याऐवजी थंड पाण्याने धुवून टाका.