लोकं मारतील म्हणून आरामबसच्या वाहन चालकाचा पळून जाताना वाहनाने चिरडले; उरुळी कांचन येथील घटना

उरुळी कांचन : दोन वाहनांच्या अपघातानंतर चारचाकी वाहनातील इसम मारतील या भीतीने रस्ता दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या खाजगी बस (ट्रॅव्हल) चालकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. पुणे – सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत साखरे पेट्रोल पंप परिसरात बुधवारी (ता. ०७) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

दत्ता दिगंबर मोरे, (वय- ४५, रा. गोफणी, ता. देवणी, जिल्हा लातूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर चालक दत्ता मोरे हे सोलापूरच्या बाजूने पुण्याकडे खाजगी आरामदायी बस घेऊन निघाला होता. यावेळी पुण्याकडे येत असताना मोरे यांनी यवत परिसरात काही चारचाकी वाहनांना कट मारला होता.

त्यामुळे घाबरून गेलेल्या मोरे यांनी खाजगी आरामदायी बस उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील साखरे पेट्रोल पंपासमोर उभी केली. आपल्याला पाठीमागून येणारे वाहनचालक मारतील या भीतीने मोरे याने सदर बस उभी केली व रस्ता दुभाजक ओलांडून सोलापूरच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याकडे निघाले होते. यावेळी रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात सदर इसमाचा जागेवरच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी तात्काळ मदत केली. तसेच अपघातग्रस्त व्यक्तीला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मोरे यांचे निधन झाल्याची माहिती दिली.
दरम्यान, घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस दाखल झाले व पुढील तपासाला सुरुवात केली.
