लोणीकाळभोर येथील शेतकरी आप्पासाहेब काळभोर यांना कृषीनिष्ठ पुरस्कार …!

उरुळी कांचन : लोणी काळभोर येथील प्रगतशील शेतकरी अप्पासाहेब रंगनाथ काळभोर यांना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार मंगळवारी (ता. २८) प्रदान करण्यात आला आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी कृषी क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या शेतकऱ्यांना कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार सन २०२०-२१ व २०२१-२२ साठी कृषि भूषण डॉ. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार व सन २०२१-२२ चा शरद आदर्श कृषिग्राम पुरस्काराच्या वितरण कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील यशवंतराव चव्हाण भवनात (जिल्हा परिषद पुणे, सोमवार पेठ) करण्यात आले होते.
अप्पासाहेब काळभोर यांनी गतवर्षी कृषी क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्राचे उच्च तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते अप्पासाहेब काळभोर यांना देण्यात आला. या पुरस्कारात ११ हजार रुपयांचा चेक, प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह व पैठणी साडी देण्यात आली आहे.
दरम्यान, कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार पुरस्कार स्वीकारल्यानंतर काळभोर दांपत्यांनी आनंद व्यक्त केला. काळभोर यांना हा पुरस्कार मिळाल्याने गावातील अनेक शेतकऱ्यांना अधिक उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळेल. अशी प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांमधून येत आहे.