दौंडमध्ये भूमी अभिलेख कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा!! महिला अधिकारी जागेवरच लाच घेताना अडकल्या…

दौंड : दौंड येथील भूमी अभिलेख कार्यालयात एका महिला अधिकारी आणि एक खाजगी कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पडकल्याची घटना समोर आली आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी सापळा रचून ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, दौंड भुमी अभिलेख कार्यालयातील भूमापकर वैशाली धस्कटे हिने तक्रारदार यांना त्यांच्या जागेचे क पत्रक व त्याचा तक्ता तयार करून देण्याकरिता १४ हजार रुपयांची लाच मागितली होती.
तडजोडीअंती दहा हजार रुपये वैशाली घसकटे हिने नेमलेला अथवा तिच्या सांगण्यावरून खाजगी इसम फय्याज शेख हा स्वीकारत असताना दोघांना आज बुधवारी (दि २०) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दौंड भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कामानिमित्त येणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांची भरमसाठ आर्थिक लुट केली जात असल्याची चर्चा होती. त्यातच लाचखोर महिला अधिकारी आणि खासगी सहायक कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात अडकल्याने चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, दौंड भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वरीष्ठ अधिकारी यांचे कसलेही नियंत्रण नाही. तसेच कायद्याची भीतीही नाही. म्हटले तर वावगे ठरणार नाही. हे अधिकारी इतके मुजोर आहेत की, हे शासनाच्या नियमांचे पालन तर करतच नाहीत, उलट कामानिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांनाच नियम आणि कायदा शिकवतात.
शेतकऱ्यांच्या कामे वेळेवर केली जात नाही. टेबलाखालून जे पैसे देतात, त्यांची कामे मात्र लवकर करतात अशी चर्चा आता सुरू आहे. दरम्यान, या प्रकारामुळे दौंड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दौंड पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.