पुढील सहा दिवसात राज्यात पुन्हा राजकीय भूकंप; ठाकरे गटातील 7 खासदार अन् 14 आमदार करणार बंड?

मुंबई : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची जोरदार चर्चा सुरू झाली असून, पुढील सहा दिवसांत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठा भूकंप होण्याचा दावा केला जात आहे. ठाकरे गटातील 7 खासदार आणि 14 आमदार पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात तापली आहे.

या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शिंदे गटातील नेते आणि आमदार कृपाल तुमाने यांनी मोठा दावा करत सांगितले की, ठाकरे गटातील 7 खासदारांसोबत अंतिम टप्प्यातील चर्चा पूर्ण झाली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पुढील 6 ते 7 दिवसांत मोठी राजकीय उलथापालथ घडू शकते.
त्यांनी असा दावाही केला की, खासदारांसोबतच 14 आमदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून बैठका आणि चर्चा सुरू असून आता त्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.

तर दुसरीकडे ठाकरे गटाने हे सर्व दावे फेटाळले आहेत. खासदार संजय राऊत यांनी सर्व खासदार आमच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आमदार आदित्य ठाकरे यांनीही कोणताही खासदार पक्ष सोडणार नसल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
