आंदेकर टोळीचा फास आवळणार ; पुणे पोलीस दलात हालचाली वाढल्या, आता लवकरच…

पुणे : पुण्यातील नाना पेठ परिसरात 5 सप्टेंबर रोजी झालेल्या आयुष कोमकर हत्याकांड प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.आयुषच्या खुनामुळे चर्चेत आलेल्या या आंदेकर टोळीला समूळ नष्ट करण्यासाठी पुणे पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता पोलिसांनी या टोळीविरोधात एकूण दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे आता आंदेकर टोळीशी संबंधित असणाऱ्यांभोवती फासा आणखीन आवळणार आहे.

कुख्यात आंदेकर टोळीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांकडून पावलं उचलली जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार याचाच एक भाग म्हणून समर्थ पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये अनधिकृत बांधकाम आणि खंडणीची मागणी या गंभीर प्रकरणांचा समावेश आहे. या प्रकरणामुळे आंदेकर टोळीच्या अडचणी वाढणार आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 सालापासून आंदेकर टोळीने एका व्यावसायिकाला सतत त्रास देत त्याच्याकडून तब्बल दीड कोटी रुपयांची खंडणी उकळली. व्यवसायात अडथळे निर्माण होऊ नयेत तसेच टोळी कडून ‘प्रोटेक्शन’ मिळावे, या कारणावरून ही रक्कम मागण्यात आली होती. आता आंदेकर टोळी विरुद्ध नव्या तक्रारी व पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी आणखी दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे आता पोलिसांच्या या पवित्र्यामुळे आंदेकर टोळीच्या अडचणी वाढल्या आहेत.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस या प्रकरणांचा सखोल तपास करणार आहेत. या तपासातून भविष्यात काय निष्पन्न होते? आंदेकर टोळीचे आणखी काही कारनामे उघड होतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
