ऐन दुष्काळात गोशाळांना मोठा दिलासा! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, जमीन नोंदणीच्या नियमांत महत्त्वाचा बदल…


मुंबई : ऐन दुष्काळात गोशाळा चालवणाऱ्या संस्थांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर फडणवीस सरकारने गोशाळांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे गोशाळांसाठी जमीन खरेदी, दानपत्र किंवा भाडेपट्टा करार करताना व्यावसायिक दराने मुद्रांक शुल्क आकारले जाणार नाही. त्याऐवजी कृषी दरानुसार नोंदणी व्यवहार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील गोशाळा चालवणाऱ्या संस्था आणि ट्रस्टना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोशाळांच्या माध्यमातून भटक्या, आजारी, वृद्ध आणि अपघातग्रस्त गोवंशाचे संगोपन केले जाते. तसेच देशी गोवंशाचे संवर्धन आणि चारा लागवडीचे कामही केले जाते. गोशाळा या सेवाभावी उद्देशाने चालवल्या जात असल्याने त्यांना व्यावसायिक दरातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील गोशाळांसाठी जमीन खरेदी, भाडेपट्टा किंवा देणगीपत्राद्वारे होणाऱ्या नोंदणी व्यवहारांना आता व्यावसायिक दराऐवजी सवलतीचे कृषी दर लागू होतील. यापूर्वी संस्था किंवा ट्रस्टच्या नावावर जमीन खरेदी करताना अनेकदा व्यावसायिक अथवा बिनशेती दराने मुद्रांक शुल्क आकारले जात होते. मात्र, नव्या निर्णयामुळे हा आर्थिक भार कमी होणार आहे.

यासंदर्भात महसूल विभागाने परिपत्रक जारी केले आहे. राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांना गोशाळांच्या जमिनीशी संबंधित दस्तांची नोंदणी कृषी मूल्यांकनानुसार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे नवीन गोशाळा सुरू करणाऱ्या संस्था आणि ट्रस्टनाही मोठा फायदा होणार आहे. तसेच गोवंश संवर्धनाच्या कार्याला प्रोत्साहन मिळणार आहे.

गोशाळेची नोंदणी कशी करावी?
गोशाळेच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांच्या यादीत नमूद केलेली कागदपत्रेच जोडणे बंधनकारक आहे. याशिवाय इतर अतिरिक्त कागदपत्रे जोडण्याची आवश्यकता नाही. पशूंचे अनुक्रमांक १ ते १० या क्रमाने नमूद करावेत.

जमीन संस्थेच्या मालकीची नसल्यास भाडेपट्टा करार जोडणे अनिवार्य आहे. तसेच पशुधनासंदर्भातील संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती भरताना संस्थेकडे उपलब्ध असलेल्या मालमत्तेचा तपशील आणि त्यांचे मूल्य नमूद करावे लागेल.

याशिवाय मागील तीन वर्षांचे एकूण उत्पन्न आणि खर्चाची माहिती देणे आवश्यक आहे. गोशाळेच्या नोंदणीसाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणेही बंधनकारक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!