राज्यातील सर्व शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार, नेमकं कारण काय?

पुणे : राज्यात उन्हाचा तडाका वाढत आहे. उष्णतेच्या या लाटेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यातील सर्व शाळा व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेची वेळ सकाळच्या सत्रात करण्याचे निर्देश शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी (माध्यमिक व उच्च माध्यमिक) आणि शिक्षण संचालक शरद गोसावी (प्राथमिक) यांनी दिले आहेत.
त्यानुसार प्राथमिक शाळांसाठी सकाळी ७ ते ११.१५ आणि माध्यमिक शाळांसाठी सकाळी ७ ते ११.४५ अशी वेळ निश्चित केली आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद यांच्या शिक्षणाधिकारी व शिक्षण प्रमुखांना हे निर्देश देण्यात आले आहेत.
स्थानिक परिस्थितीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने या कालावधीमध्ये बदल करता येईल, असेही सूचित करण्यात आले आहे. तसेच राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी विविध संघटनांकडून शाळेची वेळ सकाळची करण्याबाबत निवेदन दिले आहे.
दरम्यान. काही जिल्ह्यांनी सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याबाबत आदेश दिले आहेत. मात्र सर्व जिल्ह्यांमधील शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यातील सर्व शाळांमधील वेळापत्रक व शाळेच्या वेळेत एकवाक्यता असणे आवश्यक आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.