शुक्रवारच्या नमाजावेळी सगळ्या मुस्लिमांनी…!! पहलगाम हल्ल्यानंतर खासदार असदुद्दीन ओवैसींचे मुस्लिमांना आवाहन

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना दहशतवादी हल्ल्यात जीव गमवावा लागला. या घटनेचा निषेध केला जात आहे. घटनेतील कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. यावर आता हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला. मुस्लिम समाजाला त्यांनी खास आवाहनही केलं. शुक्रवारच्या नमाजावेळी सगळ्या मुस्लिमांनी त्यांच्या दंडावर काळी पट्टी बांधून मशिदीत जावं. त्यामुळे दहशतवादाविरोधात एकजुटीचा संदेश जाईल. दंडावर पट्टी बांधून आपण सगळ्यांना स्पष्ट संदेश देऊ. असे त्यांनी सांगितले आहे.
तसेच ते म्हणाले, आम्ही भारतीय परदेशी शक्तींना इथली शांतता धोक्यात आणू देणार नाही. या हल्ल्यानंतर शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शक्ती काश्मिरी मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा परिस्थितीत आपल्या सगळ्यांना एक होऊन शत्रूचा कट हाणून पाडायचा आहे. त्यांचा अंतस्थ हेतू हाणून पाडणं अतिशय गरजेचं असल्याचे देखील ते म्हणाले.
मी तमाम भारतीयांना आवाहन करतो की शत्रूच्या जाळ्यात अडकू नका, असेही ते म्हणाले. दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो. अशा प्रकारचे भ्याड हल्ले देशात दुही माजवण्यासाठी होत असतात. पहलगाममध्ये २६ निर्दोष पर्यटकांचा बळी गेल्यामुळे देशभर संतापाची लाट आहे. याच पार्श्वभूमीवर असदु्द्दीन ओवैसी यांनी मुस्लिम समुदायाला उद्देशून महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. तसेच १७ जण जखमी झाले. पहलगामच्या बैसरण खोऱ्यात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. तिथे असलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन गोळ्या झाडण्यात आल्या. यामुळे देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे.