राज्यात पावसाचा हाहाकार, अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी, जाणून घ्या हवामान खात्याचा इशारा..

पुणे : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे अनेक शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, बीड, अकोला, जालना, यवतमाळ, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील बाघ नदीने धोका पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलीका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पावसाचा अंदाज पाहाता नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना धरणातून नियंत्रित विसर्ग चालू असून जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाने आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही भागांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण, पुणे विभागातील घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक असणार असल्याची शक्यता आहे. ताम्हिणी घाट परिसरात सलग तिसऱ्या दिवशी 280 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून, दावडी येथेही २२३ मिमी पाऊस झालाय. यामुळे पश्चिम घाटातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.

पुण्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या १८ हजार क्यूसेक्सने सुरु असलेला विसर्ग २२ हजार क्यूसेक्सपर्यंत वाढवण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरात सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत.
राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस असला तरी मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. विशेषतः बीड, जालना, हिंगोली या जिल्ह्यांत पावसाचा पुरेसा भरणा न झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. काही भागांत मात्र नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे शेतीचे नुकसान होण्याची भीती आहे.