बीडमध्ये अजितदादा ॲक्शन मोडमध्ये, बड्या नेत्यांसह 338 जणांना दणका, घेतला मोठा निर्णय..


बीड : बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री पदाची धुरा हातात घेताच जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांनाही धक्के देण्यास सुरुवात केली आहे. विविध पक्षातील माजी आमदार, पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी धक्का दिला आहे. बीड जिल्ह्यातील 338 जणांचे शस्त्र परवाने अजित पवारांनी रद्द केले आहेत.

अजित पवार हे ॲक्शन मोडमध्ये आले असून निर्णयांचा धडाका सुरू केला आहे. अजित पवार हे बुधवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. शासकीय बैठकांसोबत अजित पवारांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. या वेळी त्यांनी चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला होता. यावेळी अजित पवार आक्रमक झाल्याचे दिसून आले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा निकटवर्तीय असल्याने धनजंय मुंडे यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. हत्या प्रकरणानंतर बीडमधील बेकायदेशीर कामांसह कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला. बीडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

माजी आमदार व जिल्ह्यातील विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि राजकीय नेते यांचे देखील शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये माजी आमदार सुनील धांडे (शिवसेना ठाकरे गट), आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड, नारायण शिंदे (धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष), अशोक चांदमल लोढा (भाजप नेते, पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय) इत्यादींचा समावेश आहे.

शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्याला चाप बसावा यासाठी ही मोठी कारवाई समजली जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचेही शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील शस्त्र परवाने चर्चेत आले होते. बीडमधील काही कुख्यातांचे बंदुकीसह रील्स व्हायरल झाले होते.

तसेच ज्यांच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत, अशांना देखील शस्त्र परवाने देण्यात आले होते. त्यावरूनही प्रशासनावर टीका झाली होती. यामुळे अजित पवारांनी ही कारवाई केली आहे. आता येणाऱ्या काळात तरी बीड येथील परिस्थिती बदलणार का? हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!