Ajit Pawar : खासदारकीला मीच उभा आहे असं समजून मतदान करा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण…

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार काल बारामती दौऱ्यावर होते. पहाटेपासूनच त्यांनी बारामतीतील विविध विकास कामाची पाहणी केली. शरद पवार यांची साथ सोडल्यावर ते बारामतीत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असते. अजित पवार आपल्या रोखठोक स्वभावाबाबत चर्चेत असतात.
विशाल जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी मी महायुतीचा उमेदवार लवकरच जाहीर करणार आहे. त्यामुळे त्या उमेदवाराला मी (अजित पवार) उभा आहे असे समजून मतदान करा.असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
अजित पवार पुढे म्हणाले, ते तुम्हाला ही शेवटची निवडणूक आहे असे सांगतील. त्यामुळे माझी तुम्हाला आग्रहाची कळकळीची विनंती आहे. तुम्हाला भावनिक केलं जाईल. काय माहिती ह्यांची कधी शेवटची निवडणूक कधी असणार आहे? लक्षात ठेवा, खासदारकीची निवडणूक आधी येणार आहे, नंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे. Ajit Pawar
त्यामुळे खासदारकीच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हाला मला जर विकासाची पावती द्यायची असेल तर ही जी सगळी कामे चाललेली आहेत, बारामतीमध्ये जो बदल झालेला आहे. शेवटी धाडस दाखवल्यावरच काम होत असतात. आणि त्या प्रकारे सगळी कामे केलेली आहेत.
मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे आपल्या कामांचा वेग असाच राहण्यासाठी माझ्या विनंतीला मान देऊन सहकार्य करा. आपण सगळ्यांनी बारकाईने विचार करा. तुम्ही मला योग्य सहकार्य केलं तर पुढची कामं होतील. नाहीतर मी तुमची कामं करण्यास बांधील नाही.
आता तुम्ही विचार करायचा आहे की विकास आणि सुधारणा तुम्हाला अशाच वेगाने करायच्या आहेत की नाही? बारामतीत आर्थिक सुबत्ता कशी नांदेल यावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. बारामतीसाठी आम्ही सगळेच जण जिवाचं रान करुन काम करत आहोत, त्याचा विचार झाला पाहिजे. असे पवार म्हणाले आहे.