शरद पवारांनी दाखवला घरचा रस्ता, आणि अजित पवारांनी पुन्हा केले जिल्हाध्यक्ष! प्रदीप गारटकर पुन्हा एकदा सक्रिय..

इंदापूर: अजित पवारांना साथ देणाऱ्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून घरचा रस्ता दाखविल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने प्रदीप गारटकर यांना ताकद देत त्यांच्या राष्ट्रवादीकडून पुन्हा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली.
अजित पवार यांच्या बंडाने राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अजित पवारांना साथ दिली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पक्ष विरोधी कृत्यामुळे पदाधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची कारवाई सुरू झाली.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्रित असताना पवार कुटुंबीयांवर प्रेम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांना फुटी नंतर चिंता लागून राहिली.
इंदापूरचे राष्ट्रवादीचे मातब्बर नेते व पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीही वातावरणाचा व कार्यकर्त्यांचा अंदाज घेत शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादीकडे न जाता अजित पवारांना समर्थन दिले.
दरम्यान त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित राहिल्यामुळे पदाधिकाऱ्यांचे कृत्य हे पक्ष शिस्त तसेच पक्षाचे ध्येय धोरणे यांच्याविरुद्ध असल्याचे सांगत तातडीने बडतर्फीची ही कारवाई केली गेली, तसा आदेशच पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढला होता. त्यामुळे शरद पवार यांच्या गटातून प्रदीप गारटकर यांची एक प्रकारे हकालपट्टीच केल्याचे दिसून आले.
मात्र अजित पवार यांच्या गटाकडून प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष म्हणून प्रदीप गारटकर यांची निवड केली.
पक्षाच्या वाढीसाठी व ध्येय धोरणासाठी सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाला गारटकर यांचे सहकार्य राहील असा आत्मविश्वास सुनील तटकरे यांना असून त्यांनी गारटकर यांना मोठ्या ताकतीने बळ देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.