आपले वय बघून तुम्ही आता तरी थांबणार आहेत की नाही? अजित पवारांनी शरद पवारांना दिला सल्ला..
मुंबई : राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्याच दोन गटांमध्ये चालू असलेल्या कलगीतुऱ्याची जोरदार चर्चा चालू आहे. अजित पवार यांच्या नेतृ्त्वाखाली एक गट सरकारमध्ये सहभागी झाला असून एक गट अजूनही शरद पवारांसोबत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत दोन्ही गटांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं.
यात अजित पवार गटाच्या बैठकीत नेतेमंडळींनी शरद पवारांना व त्यांच्या धोरणांना लक्ष्य करताना आपापल्या भूमिका मांडल्या. यावेळी अजित पवारांनी शरद पवारांवर अनेक मुद्द्यांवरून टीका केली.
अजित पवार म्हणाले, आता तुमचे वय ८२ झाले तुम्ही थांबणार आहे का नाही, एखादा माणूस सरकारी नोकरीत लागला तर ५८ व्या वर्षी निवृत्त होतो. आयएस, आयपीएस असेल तर साठाव्या वर्षी निवृत्त होतो. राजकीय जीवनात असा तर भाजपामध्ये ७५ व्या वर्षी निवृत्त केले जाते.
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींचे उदाहरण घ्या. आता नवीन पिढी पुढे येतेय, आता तुम्ही आशिर्वाद द्या ना. तुम्ही चूक लक्षात आणून द्या, चूक मान्य करत दुरुस्त करुन पुढे जाऊ, असे अजित पवार म्हणाले.
आता तुमचं वय ८२ झाले तुम्ही थांबणार आहे का नाही. तुम्ही शतायुष्य व्हा, असे म्हटले. तसेच माझी काय चूक? मला का नेहमी जनतेसमोर व्हिलन करता असा सवालही अजित पवार यांनी केला.
ही वेळ राष्ट्रवादीवर का आली?
ही वेळ आपल्यावर राष्ट्रवादीवर का आली? मी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना साहेबांच्या छत्रछायेखाली आणि मार्गदर्शनाखाली तयार झालो. घडलेलो आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही.
साहेब आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे. त्याबद्दल आमचा प्रत्येकाचे तेच मत आहे. पण, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. एकंदरीतच आज काय राज्य पातळीवर राजकारण चालले आहे. शेवटी एखादा पक्ष आपण कशाकरता स्थापन करतो. लोकांची विकासाची कामी होण्याकरता. सर्व जाती-धर्माला न्याय देण्यासाठी काम पक्ष करतो.