जरांगेंच्या ५०० कोटींच्या आरोपानंतर अजय बारस्करांचा पलटवार; ‘पिंपरी-चिंचवडचा काय माल पटवलाय?’ म्हणत दुसऱ्या ऑडिओ क्लिपचा दावा, पोलिसांकडे पुरावा देण्याचं आव्हान

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कथित ऑडिओ क्लिप सादर करत ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराबाबत गंभीर आरोप केल्यानंतर आता अजय बारस्कर यांनीही पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक दावा केला आहे. जरांगेंनी ऐकवलेल्या क्लिपमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच बारस्कर यांनी आपल्या मोबाईलमध्येही जरांगेंशी संबंधित एक ऑडिओ क्लिप असल्याचं सांगितलं. त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

‘आठ महिने क्लिप का दाखवली नाही?’
मनोज जरांगे यांनी सादर केलेली क्लिप म्हणजे ‘डोंगर पोखरून उंदीर काढला’, अशी टीका बारस्कर यांनी केली. इतके दिवस ही क्लिप आपल्याकडे असताना ती आठ महिने का दाखवली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जरांगेंनी ही क्लिप सादर करण्यामागचा नेमका हेतू काय, असा प्रश्न विचारत त्यांनी जरांगेंच्या दाव्यांवर आक्षेप घेतला.


‘माझ्याकडेही ऑडिओ क्लिप आहे’
बारस्कर यांच्या दाव्यानुसार, जरांगे यांच्या जवळच्या दोन मित्रांमधील संभाषणाची एक ध्वनिमुद्रिका त्यांच्या मोबाईलमध्ये आहे. या संभाषणात पिंपरी-चिंचवडमधील एका व्यक्तीचा उल्लेख करत ‘काय राव, जरांगेंनी काय माल पटवलाय?’ अशा आशयाचे शब्द वापरल्याचा दावा त्यांनी केला. हे शब्द आपण बोललेले नसून जरांगेंच्या जवळचे मित्र संभाषणात बोलत असल्याचं बारस्कर यांनी स्पष्ट केलं.
या दोघांचा जरांगेंशी जवळचा संबंध असल्याचा दावा करत बारस्कर यांनी त्यांच्या दौऱ्यांमध्येही हे मित्र सोबत असल्याचं म्हटलं. पुणे आणि रायगड दौऱ्यांचाही त्यांनी उल्लेख केला. बंद खोलीत नेमकी काय चर्चा होते, असा सवाल उपस्थित करत त्यांनी या कथित संभाषणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं.
तक्रार दाखल करण्याचं आव्हान
‘माझ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा, मग मी ही ऑडिओ क्लिप पोलिसांना देतो,’ असं आव्हान बारस्कर यांनी दिलं. मात्र, या क्लिपची सत्यता, संभाषणातील व्यक्तींची ओळख आणि त्याचा नेमका संदर्भ अद्याप स्वतंत्रपणे स्पष्ट झालेला नाही.
दरम्यान, जरांगे यांनी सादर केलेल्या कथित क्लिपमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यासाठी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा दावा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या कथित व्यवहारात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पैसे दिल्याचा उल्लेख असल्याचा दावाही करण्यात आला आहे. हे आरोप सिद्ध झालेले नसताना बारस्करांच्या नव्या दाव्यामुळे वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता या दोन्ही कथित ध्वनिमुद्रिकांबाबत संबंधितांकडून काय प्रतिक्रिया येतात आणि पोलीस चौकशीची मागणी होते का, याकडे लक्ष लागलं आहे.
