महालक्ष्मीचं दर्शन घेऊन गावाकडे निघाले, पण वाटेतच काळाचा घाला! साताऱ्यातील ४ तरुणांचा दुर्दैवी अंत


सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड शहराजवळ पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या सहापदरी उड्डाणपुलावर स्कॉर्पिओ गाडीची ट्रकला मागून जोरदार धडक बसली.

या भीषण अपघातात चार तरुण मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या या उड्डाणपुलावर घडलेल्या या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अपघातातील सर्व तरुण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावचे रहिवासी आहेत.

महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, कातरखटाव गावातील काही तरुण दसऱ्यानिमित्त कोल्हापूर येथील आई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी स्कॉर्पिओ गाडीतून गेले होते. दर्शन घेऊन सर्वजण रात्रीच्या सुमारास आपल्या गावी परतत होते.

दरम्यान, रात्री साधारण ११ वाजण्याच्या सुमारास कराड शहराजवळ पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीची ट्रकला मागून जोरदार धडक बसली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, स्कॉर्पिओ गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या अपघातात तेजस देशमुख (वय २५ वर्षे), सागर निंबाळकर (वय २३ वर्षे), सुयश चिंचकर (वय २० वर्षे) आणि रोहित धोत्रे (वय २१ वर्षे) या चार तरुणांचा मृत्यू झाला. तेजस देशमुख हा गाडी चालवत होता. तर ऋतुराज दुबळे (वय २१ वर्षे), शंतनू शिंगाडे (वय २० वर्षे) आणि अमन तांबोळी (वय २३ वर्षे) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेमुळे कातरखटाव गावावर शोककळा पसरली असून, मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांची घटनास्थळी धाव

अपघाताची माहिती मिळताच कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, कराड वाहतूक शाखेचे संदीप साळुंखे, संग्राम पाटील, अमृत बाबर, दस्तगीर आगा, राहुल कदम आणि सचिन देवकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यात सहभाग घेतला.

पोलिसांनी आणि नागरिकांनी मिळून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातप्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!