दुःखद! आईच्या मृत्यूनंतर मुलाचाही दुर्दैवी अंत, दोघांनाही सोबत अग्नी देण्याची वेळ आल्याने गावं हळहळल..
भोपाळ : आईच्या मृत्यूनंतर १२ तासांत लेकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात घडली आहे. आईचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर १२ तासांनंतर मुलाचा कार अपघातात शेवट झाला.
राणी देवी (५५) आणि सूरज सिंह (२२) अशी मृतांची नावं आहेत. मायलेकांच्या पार्थिवांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले. जतरी गावात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले.
मिळालेल्या माहिती नुसार, राणी देवी यांच्या पतीचं बऱ्याच वर्षांपूर्वी निधन झालं. त्यानंतर संसाराची संपूर्ण जबाबदारी एकट्या राणी देवींवर येऊन पडली. त्यांनी तीन मुली आणि तीन मुलांचं पालनपोषण केलं. राणी देवी त्यांचा मोठा मुलगा प्रकाश आणि लहान मुलगा सनी यांच्यासोबत गावी राहायच्या.
तर त्यांचा मधला मुलगा सूरज इंदूरला वास्तव्यास होता. राणी देवी त्यांचा मुलगा सनीसोबत बुधवारी दुचाकीवरुन माहेरी निघाल्या होत्या. त्यावेळी गावापासून १२ किलोमीटर दूर समोरुन आलेल्या एका दुचाकीनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
अपघातात जखमी झालेल्या सनी आणि राणी देवी यांना एका जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना रीवा येथील रुग्णालयात हलवले जात होते. मात्र वाटेतच राणी देवी यांनी प्राण सोडला. आईच्या मृत्यूबद्दल समजताच इंदोरला राहणारा सूरज त्याचा मित्र अभिषेक सिंहसोबत गावी निघाला. अभिषेकच्या कारनं दोघे गावाच्या दिशेनं निघाले.
दोघांना कार चालवता येत नसल्यानं त्यांनी एक चालक सोबत घेतला. गावापासून १०० किलोमीटर दूर सतना जिल्ह्याच्या रामपूर बघेलानमध्ये त्यांच्या कारला अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याजवळ उभ्या असलेल्या एका ट्रकवर जाऊन आदळली.
तिघांना रीवामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पैकी सूरजचा मृत्यू झाला, तर अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत. मायलेकाच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. दोघांच्या पार्थिवांना एकाचवेळा अग्नी देण्यात आला.