राज- उद्धव बंधूनंतर आता काका पुतणेही एकत्र येणार? पवार कुटूंबातील व्यक्तीने केलं मोठं वक्तव्य…

पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे येणाऱ्या काळात राजकारणात अनेक मोठ्या गोष्टी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांनी आमची भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र मोठा आहे, असं म्हणत भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते, असे म्हटले आहे.
यावर उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याची चर्चा सुरू असताना आता आता पवार घराणेही एकत्र येण्यासंदर्भात चर्चा चालू झाली आहे. कारण याच घराण्यातील एका बड्या नेत्याने अप्रत्यक्षपणे अजितदादांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पवार घराण्यातील आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी एक ट्वीट केलंय. ही पोस्ट त्यांनी अजित पवार यांना टॅग केली आहे. अजित पवार यांचा उल्लेख न करता त्यांनी सर्वच कुटुंबांनी एकत्र यायला हवं, असं म्हटलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेनंतर रोहित पवार यांनी हे ट्विट केलं आहे.
याबाबत रोहित पवार म्हणाले, मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल, तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचे हीत आहे.
सोबतच या पोस्टमद्ये त्यांनी शरद पवार, अजित पवार यांनाही टॅग केलं आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार यांना एकत्र येण्याचं आवाहन केल्याचे सांगितले जात आहे.
तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पवार कुटुंब एकत्र येणार का? यावर उत्तर देताना ‘पांडुरंगाची इच्छा आहे. नातेसंबंध माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आजही आणि उद्याही,’ असे सूचक विधान सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय घडणार हे लवकरच समजेल.