लोकसभेनंतर आता राज्यसभेतही वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर!! विधेयकाच्या बाजूने किती मतं पडली, जाणून घ्या….

नवी दिल्ली : लोकसभेनंतर वक्फ दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर करण्यात आले आहे. राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने 128 मते पडली, तर 95 ने विरोध केला. दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्याने त्याचे कायद्यात रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन सुधारण्याचे उद्दिष्ट असलेल्या या विधेयकाची जोरदार चर्चा झाली.
लोकसभेने मंजूर केल्यानंतर, वक्फ सुधारणा विधेयक गुरुवारी राज्यसभेत सादर करण्यात आले, याठिकाणी देखील यावर अनेक तास चर्चा करण्यात आली. आता फक्त राष्ट्रपतींची मंजुरी प्रलंबित आहे. एकदा कायदा लागू झाल्यानंतर, हा कायदा अब्जावधी रुपयांच्या वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता येईल, असेही सांगितले जात आहे.
आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यामुळे भारतातील मुस्लिम समुदायामध्ये संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. तसेच काही नेत्यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली होती. हे विधेयक मुस्लिम समुदायाच्या फायद्यासाठी आहे, तसेच मालमत्तेचा गैरवापर रोखण्यासाठी आहे. असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
तसेच विरोधी पक्षांनी चिंता व्यक्त केली आहे की, या विधेयकाचा वापर मुस्लिम संघटना आणि व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठी केला जात आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 मंजूर होणे ही मोदी सरकारसाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे, याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. यामुळे राज्यसभेत याची कसोटी लागणार असेही सांगितले जात होते.
गेल्या अनेक वर्षांपासून वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी काम करत आहे. आता हे विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर येणाऱ्या काळात यामध्ये काय बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून लवकरच राष्ट्रपतींची देखील मंजुरी याला मिळेल.