मी ठाण्यातून लढणार आणि जिंकून दाखवणार,आदित्य ठाकरेंच्या आव्हानावर एकनाथ शिंदे म्हणाले…

मुंबई : ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शिवसेना ( ठाकरे गट ) काँग्रेस, राष्ट्रवादीने बुधवारी पोलीस आयुक्त कार्यालयावर ‘जनप्रक्षोभ मोर्चा’ काढला होता. यानंतर झालेल्या सभेत आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले विद्यमान सरकार औटघटकेचे असून, ठाण्यातून निवडणूक लढून जिंकून दाखवणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
“लोकशाहीत कुठूनही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. शेवटी जनता ठरवत असते, कोणाला निवडून द्यायचे आणि कोणाला पाडायचे. बोलणाऱ्यांचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून शाखाप्रमूख म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या नेतृत्वाखाली काम करत होतो,” असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
शिवसेना मोठी करण्यासाठी माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून घरावर तुळशीपत्र ठेवले. सोन्याचा चमचा घेऊन आलेले आणि आयत्या पिटावर रेघोट्या ओडणाऱ्यांबद्दल मी काय बोलणार,” असा टोला एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
‘‘फेसबुकवर फक्त मजकूर प्रसारित केला म्हणून महिलेला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. पोलीस मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करीत नाहीत. आयुक्त कार्यालयात थांबत नाहीत. कारण ते ‘वर्षां’वर जाऊन मुख्यमंत्र्यांचे आदेश घेत आहेत. एका व्यक्तीने स्वार्थापोटी आणि राक्षशी महत्त्वाकांक्षेपोटी राज्याला अंधारात नेले आहे’’, अशी टीका आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केली.
‘‘हे गद्दारांचे सरकार काही वर्षांचे, काही महिन्यांचे नसून, काही तासांचे आहे. ते कोसळल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर सरकारला मदत करणाऱ्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील’’, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.