लोणीकंद वीज केंद्रावर अतिरिक्त भार ! पिंपरी, भोसरी, चाकणमध्ये दीड तासांपर्यंत भारनियमन!!

पुणे : विजेची मागणी वाढल्यामुळे महापारेषणचे ४०० केव्ही क्षमतेच्या अतिउच्चदाब (EHV) चाकण व लोणीकंद उपकेंद्रामध्ये अतिरिक्त वीजभार निर्माण झाला. परिणामी चाकण व लोणीकंद उपकेंद्र अतिभारित (ओव्हरलोड) होण्याचा धोका टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेद्वारा काही अतिउच्चदाब उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला.
त्यामुळे पिंपरी, चिंचवड गाव, भोसरी एमआयडीसी व गावठाण, मोशी, नाशिक रोड तसेच चाकण एमआयडीसी अंतर्गत काही गावांचा वीजपुरवठा रविवारी (दि. ४) दुपारी २.३० नंतर अर्धा ते दीड तासांपर्यंत बंद ठेवण्यात आला होते.
पुण्यात खळबळ! सासुरवाडीत बायकोसोबत शेतात फिरताना भरदिवसा जावयाची हत्या
याबाबत माहिती अशी, की विजेच्या वाढलेल्या मागणीमुळे महापारेषण कंपनीचे चाकण व लोणीकंद ४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रामध्ये विजेचा भार मोठ्या प्रमाणात वाढला. या अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रामधील विजेच्या अतिरिक्त भाराचे व्यवस्थापन शक्य नसल्याने दुपारी २.३० च्या सुमारास स्वयंचलित यंत्रणेद्वारे विजेचे भारनियमन करण्यात आले.
यामुळे पिंपरी विभाग अंतर्गत चिंचवड गाव, रावेत, वाल्हेकरवाडी, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, वाकड व पिंपरीच्या काही भागात दीड तास, भोसरी विभाग अंतर्गत भोसरी, नाशिकरोड, मोशी व भोसरी एमआयडीसीमधील भागात सुमारे एक तास तसेच राजगुरुनगर विभाग अंतर्गत चाकम एमआयडीसीमधील नानेकरवाडी, कुरुळी, चिमळी, म्हाळुंगे, निघोजे, खालुंब्रे, सावरदरी, वासुली, शिंदे, बांभोली, वराळे, येलवडी, सांगुर्डी या गावांमधील रहिवासी, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा ३.३० ते ४ वाजेपर्यंत अर्धा तास बंद ठेवावा लागला.
हडपसर सासवड रोडवर मोठा अपघात, चारचाकी गाडीने महिला सफाई कामगाराला चिरडले
दरम्यान, वादळामुळे केसनंद येथे एका दुकानाचा लोखंडी पत्र्याचा फलक वीजखांबावर पडला. हा खांब वाकल्याने वीजवाहिन्या देखील तुटल्या. त्यामुळे केसनंद गाव व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. या यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. तसेच महापारेषणच्या लोणीकंद ते काटापूर आणि लोणीकंद ते रांजणगाव या २२० केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांच्या आवश्यक दुरुस्ती कामामुळे दुपारी ४.३० वाजता वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे वढू खुर्द, तुळापूर, फुलगाव इस्टेट आदी परिसरातील सुमारे दोन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा रात्री ११ वाजेपर्यंत बंद आहे.