मित्राकडून घेतलेलं १७ तोळे सोनं गहाण ठेऊन जीवे मारण्याची दिली धमकी! सोरतापवाडी येथील तरुणाची लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात तक्रार…

लोणी काळभोर : लग्नात घालावयाचे आहेत असे कारण सांगून मित्रांकडून घेतलेले साडेसतरा तोळे सोन्याचे दागिने एका खाजगी फायनांन्समध्ये गहाण ठेऊन १० लाख रुपये घेतले. मित्राने दागिने परत मागीतले म्हणून त्यालाच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अक्षय गोविंद चौधरी (वय ३१, रा. सोरतापवाडी ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाश दिलीप काळभोर (वय २७, रा. सिद्राममळा, लोणी काळभोर ता. हवेली) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आकाश काळभोर व अक्षय चौधरी हे दोघेजण मित्र आहेत. दोघांमध्ये रोख व ऑनलाईन स्वरुपात पैशाची देवाण घेवाण होत होती. १५ एप्रिल रोजी आकाश याने अक्षय याला फोन करून नातेवाईकांच्या लग्नाला जायचे आहे. त्यासाठी तुझे आणि तुझ्या आईचे सोन्याचे दागिने लग्नामध्ये घालण्याकरीता हवे आहेत. लग्न झाल्यानंतर ते दागिने तुला दोन ते तीन दिवसांमध्ये परत करतो असे सांगितले.
त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सोळा लाख रुपये किंमतीचे साडेसतरा तोळे सोन्याचे दागिने अक्षय चौधरी यांनी आकाश काळभोर याला मित्र यश अशोक यादव याच्यासमक्ष लोणी काळभोर या ठिकाणी राहत असलेल्या घरी जाऊन दिले होते. लग्न झाल्यानंतर २२ एप्रिल रोजी आकाश याला दिलेले दागिने अक्षय यांनी परत मागितले असता आकाश याने सोन्याचे दागिने देण्यास टाळाटाळ केली.
यासंदर्भात अक्षय याने वारंवार फोन केला परंतु आकाश याने फोन घेण्याचे टाळले. त्यामुळे त्याच्या घरी जाऊन चौकशी केली असता तो घरी सापडला नाही. त्यामुळे त्याच्या राहत्या घरातुन त्याला फोन केला. यावेळी आकाशने फोन उचलुन “तु माझ्या घरी का गेला, मी तुझ्या कडे बघतोच आता, तुझे सोन्याचे दागिने आता परत करणार नाही, तुला काय करायचे ते कर, पोलीसात जरी केला तरी मला फरक पडणार नाही” असे म्हणुन अक्षय चौधरीला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर अक्षय याने केलेल्या चौकशीत आकाश याने दागिने हे कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एका खाजगी फायनांन्सकडे १० लाख ५ हजार गहाण ठेवल्याची माहिती पुढे आली. यांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.