धक्कदायक! झोपण्यावरुन झालेल्या वादात तरुणाला दिले पेटवून; पुण्यातील घटना..

पुणे : झोपण्यावरुन झालेल्या वादात एकाने तरुणाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून त्याला पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवार पेठेतील मुठेश्वर मंदिराच्या जवळ असलेल्या वाचनालयात सोमवारी मध्यरात्री पाऊण वाजता घडली. याप्रकरणी एकला अटक करण्यात आली आहे.
विश्रामबाग पोलिसांनी बालमुकुंद पंडीत (वय ५९, रा. बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिलिंद सिद्धपा होसकुटी (वय ३८, रा. इंदिरानगर वसाहत, खडकी) हे भाजले आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ते फिरस्ते आहेत. फिर्यादी यांना रविवारी रात्री घरी जाण्यास उशीर झाल्याने ते मुठेश्वर मंदिरात झोपण्यासाठी आले होते. त्या ठिकाणी झोपण्यावरुन त्यांचा पंडित याच्याशी वाद झाला.
तेव्हा आरोपी पंडितने त्याला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा फिर्यादी हे बाजूला असलेल्या वाचनालयात जाऊन झोपले. ते झोपेत असताना पंडित याने त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला आग लावून दिली.
त्यात त्यांच्या छातीला व हाताला भाजले आहे. शेजारील बॅनरही जळून गेला. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पंडित याला अटक केली आहे. पंडित याने त्यांच्या अंगावर कोणता ज्वलनशील पदार्थ टाकला, याची माहिती देत नसून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.