मंत्री गिरीश महाजनांचा पुतण्या भासवत तरुणाला लाखोंचा गंडा, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक : राज्यात गेल्या काही दिवसापासून फसवणुकीच्या घटना उघड येत असतानाच नाशिकच्या द्वारका परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या असल्याचे सांगत एका कुटुंबाला लाखोंचा चुना लावला आहे. या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक प्रभाकर पाटील असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.तो मूळचा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील एकुलती गावाचा रहिवासी आहे. मात्र सध्या तो नाशिकच्या द्वारका परिसरात वास्तव्यास होता. त्याने निफाड तालुक्यातील औरंगपूर येथील स्वाती राजेंद्र चाबुकस्वार यांच्या कुटुंबाला तब्बल साडे चार लाखांचा चुना लावला आहे. आपण मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या असल्याचं सांगत त्याने ही फसवणूक केली. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपी भामट्याला बेड्या ठोकल्या आहेत
दरम्यान आरोपीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार गुलाबराव पाटील यांच्यासोबत आपले जवळचे संबंध असल्याचे भासवून पोलीस खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष त्याने दाखवले होते.