तरुण हॉटेल चालकाची गळफास घेऊन आत्महत्या, थेऊर येथील घटना, कारण…

उरुळी कांचन : थेऊर येथील एका तरुण हॉटेल व्यावसायिकाने साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. थेऊर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (ता.५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली आहे.
उदय उर्फ दादा सिद्धार्थ कांबळे (वय २५, रा. थेऊर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उदय कांबळे यांचे आई वडील हे चिंतामणी गणपतीच्या परिसरात हार व फुले विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. तर उदय उर्फ दादा हा हॉटेल चालवून कुटुंबाचा आर्थिक गाडा चालवण्यासाठी हातभार लावत होता.
दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास उदय खोलीत गेला होता.उदयला उठविण्यासाठी त्याची बहीण रविवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास दरवाजा वाजवीत होती. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.
तेव्हा उदयच्या बहिणीने नागरिकांच्या साहाय्याने खोलीचा दरवाजा तोडला असता, उदय साडीला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पोलीस हवालदार विजय जाधव व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी आले.
उदयला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरने घोषित केले. दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांनी उदयचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्याचे कामकाज सुरू आहे. उदयने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी त्या दृष्टिकोनातून लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.