महाराष्ट्र पुन्हा हादरला! बुलढाण्यात चाकूचा धाक दाखवून महिलेवर आठ जणांकडून सामूहिक बलात्कार..

बुलढाणा : बुलढाणा शहरालगतच्या राजूर घाटात एका ३५ वर्षीय महिलेवर आठ नराधमांनी चाकूचा धाक दाखवून आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. मात्र, या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, बुलढाणा इथली फिर्यादी आणि तिची नातेवाईक असलेली महिला हे दोघेही दुपारी खडकी येथे जात असताना रस्त्यातील देवीच्या मंदिराजवळ असलेल्या राजूर घाटात सेल्फी काढण्यासाठी थांबले होते.

यावेळी सात ते आठजण आले आणि त्यांनी या दोघांनाही मारहाण करायला सुरुवात केली. यानंतर आरोपींनी त्यांच्या गळ्याला चाकू लावून पीडित महिलेला घाटातील देवीच्या मंदिरामागील दरीत नेले आणि तिथे आरोपींनी पीडितेवर आळीपाळीने सामुहिक अत्याचार केला. तर पीडित महिलेच्या गळ्याला चाकू लावून फिर्यादीच्या खिशातील ४५ हजार रुपयेसुद्धा लुटले.
दरम्यान, या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली असून लोक आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी पोलीस ठाण्यामध्ये तीन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.