शेती विकून पैसे व्याजाने दिले, दरमहा वीस टक्के परतावा देतो म्हणून गंडविले; लोणीकाळभोर येथील महिलेची फसवणूक…

लोणी काळभोर : शेती विकून आलेले पैसे गुंतवा त्यावर दरमहा २० टक्के परतावा मिळेल. असे आमिष दाखवत एका महिलेची तब्बल २० लाख रुपयेची फसवणूक केल्याचा प्रकार लोणी काळभोर परिसरात उघडकीस आला आहे. सुरुवातीला काही महिन्यांचा परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला, परंतु त्यानंतर लाखो रुपये बुडाल्याच्या आर्थिक तणावातून फिर्यादी महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी पुनम प्रमोद पवार (वय ५०, सध्या रा. पिंपरी, पूर्वी रा. कुशलवाटिका सोसायटी, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अतुल शामराव पवार ( रा. नांदवळ, ताकोरेगाव, जि. सातारा) आणि संतोष सुरेश काकडे (रा. स्वप्नपुर्ती पार्क, राहींजवस्ती, लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुनम पवार या ऑनलाईन पुरणपोळीच्या ऑर्डरचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सन २०२० मध्ये त्या आणि त्यांच्या पतीने चार एकर शेती विकून सुमारे २० लाख रुपये मिळवले होते. ही माहिती गावातीलच ओळखीचे असलेले अतुल पवार याला होती. त्यानंतर अतुल पवार आणि त्याची पत्नी यांनी पुनम पवार यांच्या घरी जाऊन गुंतवणुकीचा प्रस्ताव मांडला.

“माझे मित्र संतोष काकडे यांचे नागार्जुन ग्रुप आणि पुणे मेट्रो कंपनीशी टायअप आहे. पैसे गुंतवले तर दरमहा २० टक्के परतावा मिळेल,” असे आमिष दाखवत त्यांनी गुंतवणुक करण्यास भाग पडले. सुरुवातीला पुनम पवार यांनी नकार दिला होता. मात्र, अतुल पवार हा वारंवार त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पतीला दारू पाजत होता आणि पैसे गुंतवण्यासाठी प्रवृत्त करत होता. यामुळे पती-पत्नीमध्ये वादही सुरू झाले होते. अखेरीस ५ सप्टेंबर २०२० आणि १६ ऑक्टोबर २०२० रोजी प्रत्येकी १० लाख रुपये अशा एकूण २० लाख रुपयांची रक्कम अतुल पवार यांच्या ‘वर्ल्ड ट्रेडिंग कंपनी’च्या कोटक महिंद्रा बँक खात्यावर वर्ग करण्यात आली.

सुरुवातीच्या चार महिन्यांत प्रत्येकी एक लाख रुपये परतावा देण्यात आला. त्यामुळे फिर्यादींचा विश्वास आणखी वाढला. मात्र, त्यानंतर अचानक पैसे देणे बंद करण्यात आले. पुनम पवार आणि त्यांचे पती पैसे मागण्यासाठी गेले असता, संतोष काकडे यांनी “तुम्ही मला पैसे दिले का? अतुल पवारकडून पैसे घ्या,” असे म्हणत घराबाहेर हाकलून दिले. यावेळी शिवीगाळ आणि मारहाणही करण्यात आली आहे.या घटनेनंतर फिर्यादी महिलेचे पती मानसिक तणावाखाली गेले आणि काही काळानंतर त्यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर पुनम पवार यांनी पैसे परत मिळवण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. परंतु टाळाटाळ आणि धमक्या दिल्याने या दोघांविरोधात आहेत. याप्रकरणी पुनम पवार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.