लोणी स्टेशन परिसरात मोठी कारवाई, गांजाची विक्री करणाऱ्या एका तस्कराला कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान अटक…

लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. खुलेआम अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका तस्कराला लोणी काळभोर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान अटक केली आहे.
त्याच्याकडून १९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात असलेल्या इराणी वस्तीत सोमवारी (ता.१२) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई पोलिसांनी केली आहे.
मुस्लिम नासिर बेग (वय ३७, रा. पठारे बस्ती, इराणी गल्ली, कदमवाकवस्ती, ता.हवेली, जि.पुणे) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुरज किरण कुंभार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की, लोणी स्टेशन (ता. हवेली) परिसरातील इराणी गल्लीत भांडणे, हाणामारी व वादविवाद होत आहेत. या परिसरात गुन्हेगारांचे वास्तव्य असून या ठिकाणी अनेक महिला व पुरुष अवैध व्यवसाय करीत आहेत. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सोमवारी त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबविले.
तसेच या ऑपरेशन दरम्यान, गुन्हेगारांचा शोध घेत असताना, मुस्लिम बेग खुलेआम गांजाची विक्री करताना आढळून आला. त्याच्या जवळील पिशवीमध्ये 3 हजार 800 रुपयांचा १९० ग्रॅम गांजा आढळून आला. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपी मुस्लिम बेगवर अंमली पदार्थ आणि मानसोपचार विषयक पदार्थ कायदा, १९८५ अॅक्ट कलम 8 (क), 20(ब) (ii)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
दरम्यान, ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, रत्नदीप बिराजदार, दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार रामहरी वणवे, पोलीस अंमलदार सुरज कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.