पुण्यात खळबळ! भावाच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, प्रेयसीने भयंकर कारण सांगितलं…

पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

चाकणजवळील कडाचीवाडी परिसरात २ ऑक्टोबर रोजी एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या घटनेमागील खरे कारण समोर आले असून त्यामुळे सर्वे आणखीच थक्क झाले आहेत. मृत व्यक्तीच्या प्रेयसीने त्याच्या सततच्या मारहाणीला कंटाळून आपल्या भावाच्या मदतीने त्याची हत्या केल्याचे समजले आहे.

दरम्यान, या घटनेचा तपास करताना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अवघ्या दोन दिवसांत खुनाचा छडा लावून तिन्ही आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. मृत व्यक्तीचे नाव मुकेश कुमार (वय.२४) असे असून, त्याचा खून त्याच्याच प्रेयसीने आणि तिच्या साथीदारांनी मिळून केला असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश कुमार आणि आरती कुमारी बिजलाउराम उराव (वय.२३) हे दोघे सुमारे तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. या दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे आणि मुकेश आरतीला वेळोवेळी मारहाण करीत असे. सततच्या त्रासामुळे आरती संतापली होती. तिने सूड उगवण्याचा निर्णय घेत आपल्या भावाला आणि मैत्रिणीला या कटात सामील करून घेतले.
दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी तिघांनी मिळून मुकेशवर हल्ला चढवला. धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करण्यात आले. या भीषण मारहाणीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून चाकणजवळील निर्जन भागात टाकून दिला होता.
मृतदेह सापडताच पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमधून संशयास्पद हालचाली दिसून आल्या तसेच मुकेशसोबत राहणारे काहीजण अचानक गायब झाल्याचे लक्षात आले. या धाग्यांवरून तपास पुढे नेण्यात आला. अखेर पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी संभाजीनगर भागात लपले आहेत. तत्काळ सापळा रचून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
