बिहारमध्ये मोठा उलटफेर? भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोरांची आघाडी; पहिल्या फेरीत किती मते मिळाली?


नवी दिल्ली : देशातील तीन राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू असून, सर्वाधिक लक्ष लागलेल्या बिहारमधील बांकीपूर मतदारसंघातून पहिल्या फेरीचा निकाल समोर आला आहे.

‘जन सुराज’चे संस्थापक प्रशांत किशोर यांनी २,२२० मते मिळवत दमदार आघाडी घेतली आहे. भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांना १,४२३ मते, तर आरजेडीच्या रेखा गुप्ता यांना ५०१ मते मिळाली आहेत. त्यामुळे पहिल्या फेरीनंतर प्रशांत किशोर सुमारे ८०० मतांनी आघाडीवर आहेत.

मात्र, मतमोजणीच्या अनेक फेऱ्या अद्याप बाकी असल्याने अंतिम निकालाबाबत चित्र बदलण्याची शक्यता कायम आहे. ईव्हीएममधील पुढील मतमोजणीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी ही जागा जिंकली होती. राज्यसभेवर निवड झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने येथे पोटनिवडणूक झाली. यावेळी प्रशांत किशोर स्वतः मैदानात उतरल्याने या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

बांकीपूरमध्ये भाजपचे नीरज कुमार सिन्हा, जन सुराजचे प्रशांत किशोर आणि आरजेडीच्या रेखा गुप्ता यांच्यात तिरंगी लढत झाली आहे. या मतदारसंघात एकूण ३.७९ लाखांहून अधिक मतदार असून, निवडणुकीच्या रिंगणात २५ उमेदवार आहेत.

मतदानासाठी ५६९ कंट्रोल युनिट्स, १,१४६ बॅलट युनिट्स आणि ६१७ व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. तांत्रिक बिघाडामुळे काही यंत्रे बदलण्यात आली होती. मतदानादरम्यान प्राप्त झालेल्या सर्व ५९ तक्रारींचे वेळेत निवारण करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!