पुणे जिल्ह्यासाठी आज ऐतिहासिक क्षण; जिल्ह्याच्या विकासाचा गेमचेंजर ठरणाऱ्या रस्ते प्रकल्पांचे आज भूमिपूजन; जागतिक किर्तीच्या उन्नत मार्गांचे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूमिपूजन…

जयदिप जाधव उरूळी कांचन : पुणे शहराची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी तसेच पुणे- अहिल्यानगर , पुणे- सोलापूर उपनगरातील वाहतुक कोंडीवर पर्याय म्हणून दु -मजली व मेट्रोची रचना असलेला उन्नत मार्गाची प्रतिक्षा अखेर पूर्ण झाली आहे. जागतिक दर्जाचा व पुणे शहर विकासाच्या संपन्नेचा खरा कॉरीडर असलेल्या उन्नत मार्गाचे खऱ्या अर्थाने आज पायाभरणी रचली जात आहे. या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवर अशा पध्दतीने उड्डानपूलावर महामार्ग होण्याची २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय वाहतुक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली घोषणा आज सत्यात उतरली आहे.

पुणे परिसरातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि दळणवळणाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आलेल्या तीन अत्यंत महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन आज पुण्यात गणेश कला क्रिडा संकुल येथे दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी , पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम संपन्न होणार आहे.
केंद्रात व राज्यात भाजपप्रणीत मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पुण्यातील वाहतुक कोंडीची स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन पुणे- सोलापूर ,पुणे-अहिल्यानगर तसेच चाकण -शिक्रापूर -तळेगाव या रस्त्याला चौपदरीकरण करुन उपनगर व औद्योगिक वसाहतीत नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यासाठी ही वाहतुक व्यवस्था सोईस्कर व्हावी म्हणून तत्कालीन सरकारने आखलेल्या या महत्वकांक्षी प्रकल्पाचे आज मूहर्तमेढ रोवली जात आहे.

या राष्ट्रीय महामार्गावरील भविष्यातील तरतूदीची महत्त्व लक्षात घेता तत्कालीन आमदार स्व. बाबुराव पाचर्णे, दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधिमंडळ अशा पध्दतीने लोकवस्तीतून भूसंपादन टाळून दुमजली उड्डानपूल उभारुन महामार्ग विकसित करावा म्हणून सातत्याने या महामार्गाची उभारणी करावा असा पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना १२ वर्षे उलटून यश मिळाले असून राज्य व केंद्र सरकारने महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ या नवीन स्थापन केलेल्या हेडनुसार या रस्त्याच्या विकासाची जबाबदारी देऊ केली आहे.

या उन्नत मार्गासहीत देहू ते पंढरपूर व आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग, पुणे रिंग रोड, अष्टविनायक मार्ग तसेच बेल्हा- जेजुरी व दौंड- काष्टी-अहिल्यानगर आदी प्रमुख मार्गांनी जिल्ह्यातील विकासाच्या गती मिळणार आहे. या मार्गांनी अवघड दिवे घाट, शिंदवणे घाट ,रोटी घाट , बारामती बाह्यवळण मार्ग हे मार्ग दृष्टीपथात आले आहे.
हडपसर – यवत उन्नत , पुणे – शिरूर द्रुतगती महामार्ग आणि तळेगाव – चाकण – शिक्रापूर उन्नत महामार्ग या तीन प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे. हे तिन्ही प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. हडपसर ते यवत उन्नत मार्ग हा पूर्व पुण्याचा चेहरा मोहरा बदलणारा प्रकल्प ठरणार आहे. पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते यवत हा पट्टा सध्या तीव्र वाहतूक कोंडीसाठी ओळखला जातो. हडपसर, १५ नंबर, शेवाळेवाडी, मांजरी, लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि यवत या भागांचे झपाट्याने झालेले नागरीकरण आणि औद्योगिक विकासामुळे या रस्त्यावर वाहनांचा प्रचंड ताण आहे. हा प्रस्तावित उन्नत मार्ग या संपूर्ण परिसराचा कायापालट करणारा ठरेल. हा मार्ग मेट्रो प्रशासनाच्या समन्वयातून राबविण्यात येणार असल्याने एकाच खांबावर मेट्रो आणि उड्डाणपूल अशी रचना यात पाहायला मिळू शकते.
या प्रकल्पामुळे दळणवळण सोयीस्कर होणार असून त्याचा थेट फायदा परिसरातील नागरिकांना होणार आहे. हडपसर, १५ नंबर, शेवाळवाडी, कवडीपाट टोलनाका, लोणी स्टेशन, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन या मुख्य चौकांमध्ये लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आता इतिहास जमा होतील. नागरिकांची वाहतूक कोंडीतून कायमची मुक्तता होईल. स्थानिक वाहतूक खालच्या रस्त्याने आणि लांब पल्ल्याची वाहतूक थेट उन्नत मार्गावरून सुसाट धावेल. त्यामुळे वेळेची आणि इंधनाची मोठी बचत होईल. हडपसर ते यवत हे अंतर कापण्यासाठी सध्या एक ते दीड तास वेळ लागतो. हा उन्नत मार्ग झाल्यानंतर हे अंतर अवघ्या अर्ध्या तासाच्या आत पार करणे शक्य होईल. यामुळे कोट्यवधी रुपयांच्या इंधनाची बचत होईल.
पुणे – सोलापूर महामार्ग हा अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. स्थानिक नागरिक आणि वेगवान वाहने यांचे रस्ते वेगळे झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण नगण्य होईल, अपघातांच्या संख्येत घट होईल. जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण झाल्यास वारकऱ्यांचा प्रवासही सुकर होईल व पालखी मार्गाला गती येईल. या उन्नत महामार्गामुळे उद्योग आणि व्यवसायाला बुस्टर डोस मिळेल. कच्चा व उत्पादित झालेल्या मालाची वाहतूक, साठवण आणि वितरण वेगवान होईल. उरुळी कांचन, यवत आणि जेजुरी एमआयडीसीला जोडणाऱ्या भागातील मालवाहतूक जलद गतीने होईल. पुण्यातून सोलापूर, उस्मानाबाद, लातूरकडे जाणारा व तिकडून पुण्या – मुंबईकडे येणारा माल विनाअडथळा पोहोचेल.
या उन्नत महामार्गामुळे या भागातील घर बांधणी व्यवसायात मागणीचे प्रमाण वाढेल. वाहतूक सुरळीत झाल्यामुळे मांजरी, शेवाळेवाडी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन परिसरातील घरांना आणि व्यावसायिक जागांना मोठी मागणी येईल. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी या परिसरात राहणे अधिक सोयीचे होईल. वाहतूक कोंडीमुळे ग्राहक या भागातील बाजारपेठेत येणे टाळत असत. आता रस्ता मोकळा झाल्याने स्थानिक हॉटेल्स, दुकाने आणि पूरक व्यवसायांना मोठी तेजी येईल. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांचा विस्तार होईल.
कोणत्याही मोठ्या विकासकामाचे जसे फायदे असतात, तसेच बांधकाम काळात काही तोटे किंवा आव्हानेही असतात. पुढील ४ वर्षे या मार्गावर पिलर्स (खांब) उभारणीचे काम चालेल. या पार्श्वभूमीवर पर्यायी रस्ते उपलब्ध करून न दिल्यास सद्यस्थितीत वाहतूक कोंडी आणखी वाढू शकते. यासाठी पुणे महानगर पालिका आणि वाहतूक पोलिसांची स्वतंत्र बैठक होणार आहे. उड्डाणपुलामुळे महामार्गाच्या कडेला असणारे काही छोटे व्यावसायिक, ढाबे, हाॅटेल व इतर छोटे – मोठे व्यावसायिक यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, कारण वेगाने जाणारी वाहने थेट पुढे निघून जातील. काही ठिकाणी सेवा रस्ते रुंद करण्यासाठी स्थानिक जागा मालकांना प्रशासनाशी सहकार्य करावे लागेल. ‘सर्वसमावेशक वाहतूक आराखडा’ तयार केला तरच हे प्रकल्प स्थानिक लोकांना त्रास न देता पूर्ण होऊ शकतील.
एकंदरीत विचार करता, तळेगाव – चाकण – शिक्रापूर आणि पुणे – शिरूर या मार्गांमुळे जसा चाकण आणि रांजणगाव या औद्योगिक पट्ट्याला फायदा होणार आहे, तसाच हडपसर – यवत उन्नत मार्गामुळे पूर्व पुण्याच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. तात्पुरती गैरसोय सोडली, तर हा प्रकल्प पुणेकरांच्या आणि या परिसरातील नागरिकांच्या आयुष्यात समृद्धी व विकासाची नवी पहाट आणणारा ठरणार आहे, यात शंका नाही.
लोकप्रतिनीधींच्या पाठपुरव्याला मुख्यमंत्र्यांची साथ..
जागतिक किर्तीचा उन्नत महामार्ग या ठिकाणी विकसित होणार म्हणून झालेली घोषणा बहुतांशी नागरीकांना हा विषय टिंगल टळावीचा विषय म्हणून काही काळ चर्चेत होता. अशा पध्दतीने मार्ग होणार, तो कधी विकसित होणार म्हणून काही मंडळी या मार्गांची टिंगल उडवीत राहिले. मात्र प्रामुख्याने या मार्गाला आमदार राहुल कुल, ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी वेळोवेळी लावून धरल्याने स्व. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी वेळोवेळी या मार्गांना वेळोवेळीअर्थसंकल्पात तरतूद केल्याने हा मार्ग विकसित कायाकल्प घडला आहे.
इफ्रामॅन देवेंद्र फडणवीस यांनी बदलली पुण्याची दिशा
पुण्यात साकारण्यात येत असलेले मेट्रो, रेल्वे मार्ग, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, एमएसआरडीसी ,पीएमआरडी रिंग रोड , पालखी मार्गांची रचना आदी प्रकल्पांसाठी इफ्रामॅन अशी ओळख असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांची जोड मिळाली आहे. या प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी १ लाख कोटी रुपयांहून अधिक भूसंपादनाची तरतूद या प्रकल्पांसाठी मौलाचा दगड ठरत आहे.