आळंदीजवळील सोळू येथील कंपनी स्फोटात मृतांचा आकडा ७ वर, स्फोटास कारणीभूत ठरलेल्या माजी सभापतीच्या मूलास अटक..!!


पुणे : खेड तालुक्यातील सोळू येथील बंद असलेल्या स्पेसिपिक आलोय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटातील मृतांचा आकड्याची वाढ झाली आहे. आणखी दोघांचा मृत्यू झाल्यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा सात एवढा झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

या भीषण स्फोटात सात जणांचा बळी गेला आहे, तर पंधरा जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. खेड तालुक्यातील एका बड्या राजकीय नेत्याच्या मुलाला देखील अटक करण्यात आली आहे.

आरोपी नरेंद्र मोहनलाल सुराणा (रा. गुलटेकडी, पुणे) आणि फनिंद्र हरकचंद मुनोत (रा. शिवाजीनगर, पुणे) या दोघा कंपनी मालकांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता आधी पोलिस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीचा आदेश मिळाला आहे. सध्या दोघेही आरोपी येरवडा कारागृहात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटासाठी कारणीभूत ठरलेले आरोपी शुभम रामदास ठाकूर (वय,२६) आणि आकाश बाबूराव गावडे ( वय, २१) यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर यांचा मुलगा शुभम ठाकूर याला या गुन्ह्यात अटक करण्यात आल्याने या दुर्घटनेत नेमका कुणाचा आणि कसा सहभाग आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी सभापती रामदास ठाकूर यांचा मुलगा शुभम ठाकूर आणि आकाश बाबूराव गावडे (रा. धानोरे, ता. खेड) यांना पोलिसांनी तपासात निष्पन्न करून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. माजी सभापती रामदास ठाकूर यांचे चिरंजीव शुभम ठाकूर यांनी स्फोट झालेल्या कंपनीची जागा नुकतीच बॅंकमार्फत झालेल्या लिलावात खरेदी केली होती. मृतांच्या नातेवाइकांना, तसेच जखमी झालेल्यांना अद्याप कंपनी अथवा शासनाकडून कोणतीच आर्थिक मदत मिळालेली नाही.

दरम्यान, या दुर्घटनेत सुरुवातीपासून स्फोट नेमका कशाचा झाला? स्फोट झाला त्यावेळी कंपनीत काही प्रक्रिया केली जात होती का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत. पुढील तपास पोलीस करत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!