टायगर श्रॉफवरील गोळीबारामागे मोठं जाळं? सूरत एक्स्प्रेस अन् राजस्थानमध्ये पोलिसांची धडक; संशयित ताब्यात.. रेकीच्या संशयाने तपासाला नवं वळण!

मुंबई : बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबारप्रकरणात तपासाला वेग आला असून, सूरत एक्स्प्रेसपासून राजस्थानमधील कोटापर्यंत पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सूरत एक्स्प्रेसमधून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच कोटा येथून आणखी तीन संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या सर्वांचा गोळीबारातील सहभाग अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे हल्लेखोर नेमके कोण आणि त्यांना पडद्यामागून कोणाची मदत मिळाली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

जुहूमध्ये सात गोळ्या; चालक आणि चाहता जखमी
रविवारी संध्याकाळी सुमारे सात वाजता जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात टायगर श्रॉफच्या गाडीवर दोन हल्लेखोरांनी सात गोळ्या झाडल्याची माहिती आहे. या गोळीबारात टायगरच्या गाडीचा चालक आणि गर्दीत उभा असलेला त्याचा एक चाहता जखमी झाला. घटनेनंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले.


दुचाकी सोडली, लोकलने बोरिवली गाठलं!
गोळीबारानंतर हल्लेखोरांनी अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर दुचाकी सोडल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानंतर त्यांनी लोकल रेल्वेने बोरिवली स्थानक गाठले आणि तेथून सूरतच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेसने प्रवास केल्याचा पोलिसांना संशय आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सूरत एक्स्प्रेसमध्ये कारवाई करून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
दुसरीकडे, राजस्थानमधील कोटा शहरातून तीन संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. त्यापैकी एक जण महाराष्ट्रातील, तर दोघे हरियाणातील असल्याचे सांगितले जात आहे. या तिघांना घेऊन पोलिसांचे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे वृत्त आहे. मात्र, सूरत एक्स्प्रेसमधील संशयित आणि कोटा येथून अटक केलेल्या व्यक्तींचा एकमेकांशी काय संबंध आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घरापासून फुटबॉल मैदानापर्यंत रेकी?
या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. टायगर श्रॉफचे घर आणि तो नियमितपणे फुटबॉल खेळण्यासाठी जात असलेल्या मैदानाची आधीच रेकी करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. रेकी करण्यासाठी स्वतंत्र पथक कार्यरत होते का, याचाही तपास सुरू आहे.
टायगर कोणत्या गाडीतून प्रवास करतो आणि त्याची नेहमीची ठिकाणे कोणती, याची माहिती रेकी करणाऱ्यांनी गोळीबार करणाऱ्यांना दिली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे केवळ दोन हल्लेखोर होते की त्यांना मदत करणारे आणखी काही जण आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
चौकशीतून कोणता धागा मिळणार?
संशयितांच्या चौकशीतून हल्ल्याचा कट, रेकी करणारे लोक आणि गोळीबारामागील कारण याबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींचा हल्ल्यातील सहभाग अद्याप निश्चित झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील संशयितांची भूमिका आणि हल्ल्यामागील संपूर्ण जाळे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
