लाडक्या बहिणींना सरकारची मोठी भेट! ‘या’ महिलांना मिळणार 60 हजार रुपयांचे अनुदान


मुंबई : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी सरकारने महिला बचत गटांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या महिला बचत गटांना 60 हजार रुपयांचे खेळते भांडवल अनुदान स्वरूपात दिले जाणार असून, त्यासोबतच कमी व्याजदरात कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या निर्णयामुळे महिलांना स्वयंरोजगार, लघुउद्योग, गृहउद्योग आणि शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहेत. त्याअंतर्गत गटाची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारकडून 30 हजार रुपये आणि राज्य सरकारकडून 30 हजार रुपये असे एकूण 60 हजार रुपयांचे खेळते भांडवल दिले जाते. ही रक्कम अनुदान असल्यामुळे ती परत करण्याची गरज नसते.

गट स्थापन झाल्यानंतर सहा महिन्यांनी सुरुवातीला 60 हजार रुपयांचे कर्ज मिळते. गटाची आर्थिक शिस्त आणि व्यवहार चांगले असल्यास कर्जाची मर्यादा 1.5 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाते. तसेच ‘उमेद’ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बँकांकडून 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज केवळ 7 टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले जाणार आहे. 3 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जासाठी 12 टक्क्यांपर्यंत व्याजदर लागू होईल.

सध्या महाराष्ट्रात लाखो महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या असून, या योजनेमुळे आणखी मोठ्या संख्येने महिलांना बचत गट चळवळीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला होणार असून, रोजगारनिर्मितीलाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!