पैशाच्या वादातून नायगाव येथे दोन गटात मोठा राडा! सात जणांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…


उरुळी कांचन : दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक धक्कादायक घटना नायगाव येथून समोर आली आहे. पैश्याच्या कारणावरून दोन गटात शिवीगाळ, दमदाटी करीत कोयत्याने वार केल्याची घटना नायगाव-पेठ-वडाचीवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. ०५) घडली आहे.

याप्रकरणी दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी दोन्ही गटातील ७ जणांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

पहिल्या घटनेत मनिषा संपत चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्वप्नील शिवाजी चौधरी (रा. नायगाव पेठ वडाचीवाडी ता. हवेली), हितेश कांचन, दिपक धनकुडे रा. दोघेही उरुळी कांचन ता. हवेली), यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत स्वप्नील शिवाजी चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संपत तुकाराम चौधरी, मनिषा संपत चौधरी, यश संपत चौधरी व सोहम संपत चौधरी सर्व रा. वडाचीवाडी पेठ ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा चौधरी या नायगाव पेठ परिसरातील वडाचीवाडी परिसरात राहतात. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्वप्नील चौधरी यांच्या गुरांच्या गोठयाजवळ त्यांचा मुलगा यश याला स्वप्नील चौधरी, हितेश कांचन व दिपक धनकुडे यांनी शिवीगाळ करत दमदाटी करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच दगड फेकुन मारल्याने डोक्यात व अंगावर दुखापत झाली.

या सर्वांची भांडणे सोडवण्यासाठी मनिषा चौधरी या गेल्या होत्या. भांडणे सोडवताना वरील तिघांनी हातातील दगड फेकुन मारले. दरम्यान, यश व मनिषा चौधरी घरी निघुन गेले असता स्वप्नील चौधरीने जबरदस्तीने घरात घुसुन शिवीगाळ दमदाटी करत दगडफेक केली.

तसेच मनीषा चौधरी यांना मारहाण करुन घरातील किचनची काच, बेडरुमची काच, प्लास्टिक खुर्ची, पिठाची गिरण, दरवाजा फोडुन नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार वरील तिघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. 2023 कलम 333, 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 324(4)(5), 125(a), 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत स्वप्नील चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वडाचीवाडी-पेठ (ता. हवेली) येथे असलेल्या गोठयात ऊसाचे पैसे देण्याच्या कारणावरून संपत चौधरी, मनिषा चैाधरी, यश चौधरी, सोहम चौधरी यांनी शिवीगाळ केली.

दरम्यान, तसेच संपत चौधरी व यश चौधरी यांनी कोयत्याने तोंडावर तसेच डोक्यात वार करून गंभीर दुखापत केली. तसेच मनिषा चौधरी हिने डोळ्यात मसाला टाकून शिवीगाळ दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार वरील चौघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात कलम 117, 115(2), 118(2), 352, 351(2)(3), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!