रक्ताच्या नात्याला काळिमा! भावाच्या संपत्तीसाठी सख्ख्या भावाने दिली सुपारी, भिवंडीत थरारक हत्या उघड

भिवंडी : सकाळी कामावर निघालेला 40 वर्षीय व्यक्ती आणि काही तासांतच त्याच्या हत्येने उडालेली खळबळ… आणि सर्वात धक्कादायक म्हणजे या हत्येमागे त्याचाच सख्खा भाऊ असल्याचा उलगडा! भिवंडी तालुक्यातील शेडगाव येथे 12 मे रोजी घडलेल्या या थरारक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला होता.

कामावर जात असताना वाशिंद–अंबाडी रोडवरील शेडगाव फाटा परिसरात गाव तलावाजवळ परेश टोलाराम पाटील (वय 40) यांची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून निर्घृण हत्या केली होती. घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणाचा तपास गणेशपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत गांभीर्याने सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव आणि संदीप गिते यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी परिसरातील तब्बल 200 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले, तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली.

तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा क्रमांक मिळाल्यानंतर पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आले. त्यानंतर राकेश भगवान पाटील, प्रेमजीत मधुकर घरत आणि दक्षत भानुकांत भोईर (सर्व रा. आगरवाडी, केळवा, जि. पालघर) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी हत्येची कबुली दिली.

या प्रकरणातील सर्वात मोठा धक्का म्हणजे फिर्यादी असलेला मृत व्यक्तीचा सख्खा भाऊ नरेश टोलाराम पाटील हाच या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. नरेशनेच भावाच्या हत्येसाठी 10 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही भावांमध्ये दीर्घकाळापासून शेतजमीन आणि घराच्या मालकीवरून वाद सुरू होता. मोठ्या भावाने सामायिक जमीन आणि घर स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा राग मनात धरून लहान भाऊ नरेशने हा कट रचला. त्याने केळवा (पालघर) येथील गुंडांशी संपर्क साधून सुपारी दिली आणि हत्या घडवून आणली.
या घटनेमुळे भिवंडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून, “रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.