पुणे हादरलं! स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार, घटनेने उडाली खळबळ..

पुणे : पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. स्वारगेट बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला आहे. हा प्रकार पहाटेच्या सुमारास घडला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित तरुणी ही फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकावर आली होती. मात्र पहाटेच्या साडे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. दत्तात्रय रामदास गाडे या व्यक्तीने तरुणीला फसवून आगारातील अंधारातील शिवशाही बसमध्ये बसवले.
त्यानंतर बसचा दरवाजा लावून घेत तरुणीवर अत्याचार केला. नराधमावर यापूर्वी देखील गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येत असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मध्यवर्ती भागातील गजबजलेल्या भागामध्ये असा प्रकार घडल्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.

पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. यावरुन आता माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी जोरदार टीका केली आहे. रवींद्र धंगेकर यांनी या पुण्यातील स्वारगेट भागातील अत्याचार प्रकरणावरुन विद्यमान नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत.
माजी आमदार धंगेकर म्हणाले की, स्वारगेटमध्ये हा प्रकार घडला त्याच्या हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे. हा एक प्रकार उघडकीस आला असला तरी हा घडलेला पहिला प्रकार नाही. सर्रास हे प्रकार स्वारगेट भागामध्ये घडत आहेत.
स्वारगेट बसस्थानकाच्या आवारामध्ये मटका, दारु आणि अवैध प्रकारचे धंदे सुरु आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होत असतो. स्वारगेट बसस्थानकामध्ये माहिती नसलेले लोकांचा फायदा घेण्यासाठी थांबलेले असतात. स्वारगेट स्थानकावर हे प्रकार सर्रास घडत आहेत, असा आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.