धक्कादायक! २० वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून निर्घुण खून; डोक्यात, तोंडावर केले गंभीर वार, कोरेगाव मूळ येथील घटनेने खळबळ…

उरुळी कांचन : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
अशातच आता कोरेगाव मूळ – प्रयागधाम रस्त्यावर अज्ञात इसमांनी एका २० वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला. मंगळवारी (ता. १४) रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
पूनम विनोद ठाकूर (वय -२०. रा. गगन आकांक्षा सोसायटी, कोरेगाव मूळ, ता. हवेली) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मृत तरुणीचा भाऊ मनीष विनोद ठाकूर (वय- २३) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूनम ठाकूर हि उरुळी कांचन येथील एका मेडिकल मध्ये कामाला जात होती. बुधवारी रात्री कोरेगाव मूळ – प्रयागधाम रस्त्यावर अज्ञात इसमांनी तीच्यावर दगडाने जोरदार हल्ला चढवला. यामध्ये तरुणीच्या तोंडावर व डोक्यात मोठ्या जखमा झाल्या होत्या.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित तरुणीला उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी संगितले. यावेळी खून झालेल्या ठिकाणी पूनम वापरत असलेली पर्स, चप्पल, पाण्याची बॉटल, मोबाईल फोन अशा वस्तू आढळून आल्या आहेत.
खून कोणत्या कारणामुळे झाला याची अद्याप माहिती मिळू शकली नसून घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून आरोपींच्या शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
सदर ठिकाणी पोलीस उपाधीक्षक भाटे, स्थानिक गुन्हे शाखेचे अमित सिदपाटील, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे, पोलीस कर्मचारी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असून घटनास्थळी ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.