बारामती येथे बंदूकीचा धाक दाखवून पेट्रोल पंप व्यवस्थापकाकडील रोकड लुटण्याचा प्रयत्न, घटनेने उडाली खळबळ…
बारामती : बारामती शहरातील कृष्णा पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक मयूर शिंदे यांना आज भर दुपारी चोरट्यांनी मारहाण करीत जखमी केले. त्यांच्याकडे असलेली रोकड लुटण्याच्या प्रयत्न दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी केला.
बारामतीतील नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांच्या मालकीचा कृष्णा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर मयूर शिंदे व्यवस्थापक म्हणून काम करतात.
मिळालेल्या माहिती नुसार, सोमवारी (ता. ७) नेहमीप्रमाणे ते शनिवार व रविवारी जमा झालेली रोकड बँकेमध्ये भरण्यासाठी निघाले होते. त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या व दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड असलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र मयूर शिंदे यांनी प्रतिकार करत त्यांना पिशवी दिली नाही.
मयूर शिंदे यांना चोरट्यांनी मारहाण केली या त्यांच्या डोक्याला जखम झाली असून त्यांना पाच टाके पडल्याची माहिती किरण गुजर यांनी दिली.या संदर्भात पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून तातडीने तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली.
दरम्यान ही घटना माहितगार माणसांनीच केलेली असावी असा संशय किरण गुजर यांनी व्यक्त केला आहे. बारामतीत भर दिवसा बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरीचा झालेला प्रयत्न हा काळजी करायला लावणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तीन पथके चोरट्यांच्या मागावर असल्याचे सहायक पोलिस निरिक्षक प्रकाश वाघमारे यांनी सांगितले. वर्णनानुसार सीसीटीव्ही फूटेज तपासत असून इतर तांत्रिक बाबींचाही तपास पोलिसांनी तातडीने सुरु केला आहे.