बारामती मधील महाड – ते नसरापूर– चेलाडी फाटा राष्ट्रीय महामार्ग घोषित करा : खासदार सुप्रिया सुळे


पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील नसरापूर ते मढेघाट आणि पुढे केळद पासून कर्णवडी मार्गे महाडला जोडणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करून लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. हा रस्ता झाल्यास येथील दळणवळण वाढून या भागातील स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना सुळे यांनी लेखी पत्र पाठवले असून लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा, अशी विनंती केली आहे. महाड – रानवडी – कर्णवडी – मढेघाट – केळद – पासली – भट्टी – वेल्हे – आंबवणे – नसरापूर – चेलाडी फाटा राज्य मार्ग 106 हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग 48 – पुणे बंगळूर हायवे व राष्ट्रीय महामार्ग 66 मुंबई-गोवा हायवे या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा मार्ग असून पुण्याहून कोकणला जाणारा जवळचा मार्ग आहे. हा राष्ट्रीय महामार्ग असा घोषित करून त्याचे काम पूर्णत्वास जाणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

वेल्हे तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असून या परिसरात इतिहासाची साक्ष देणाऱ्या बनेश्वर, किल्ले राजगड, तोरणा तसेच मढेघाट आदि वास्तू, किल्ले आणि देवस्थानांची रेलचेल आहे. त्यामुळे गडकोटांना आणि ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देणाऱ्या गडप्रेमी आणि अभ्यासक तसेच पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे. याबरोबरच वेल्हे तालुका हा दुर्गम डोंगराळ भाग असल्याने या भागातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी फारश्या उपलब्ध नाहीत. हे लक्षात घेता या भागातून जाणारा महामार्ग विकसित केल्यास या परिसरातील दळणवळण वाढेल.

यामुळे वेल्हे तालुक्याशी आजूबाजूच्या परिसराचा संपर्क वाढून या परिसरातील पर्यटनासही चालना मिळेल. याबरोबरच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
तरी कृपया महाड – रानवडी – कर्णवडी – मढेघाट – केळद – पासली – भट्टी – वेल्हे – आंबवणे – नसरापूर – चेलाडी फाटा रस्ता हा राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करून राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करून त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!