मृतदेह कुजल्याने मदतकार्य थांबविण्याचा निर्णय ; इर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांची संख्या २९ वर , ७८ जण अद्याप बेपत्ता

रायगड: इर्शाळवाडीतील मदत आणि बचाव कार्य सलग चौथ्या दिवशी सुरू होते. मात्र दरडीखाली सापडलेल्या ५ मृतदेह हे कुजलेल्याने तसेच परिसरात दुर्गंधी वाढल्याने मदतकार्य थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत मृतांची संख्या २९ वर पोहोचली आहे.तर अद्याप ७८ जण बेपत्ता आहे.

सततच्या पावसामुळे शोधकार्यात प्रचंड अडचणी येत असून यंत्रसामग्रीची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात चिखल, दगड आणि मोठमोठी झाडे सर्वत्र पसरल्याने मदतकार्य कठीण बनले आहे. राष्ट्रीय आपत्ती कृतिदलाचे जवान, ‘एल अँड टी’चे कामगार, अपघातग्रस्त मदत पथक, स्थानिक तरुण, इर्शाळवाडीतील ग्रामस्थ आणि कोल्हापूर व्हाईट आर्मीचे जवान मृतदेह, गाडल्या गेलेल्या जनावरांना बाहेर काढण्यासाठी चौथ्या दिवशीही राबत होते.
दुर्घटना होऊन चार दिवस झाल्याने दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने मदतकार्य थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
