लाचखोरीचे सत्र सुरूच! आता महापालिकेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यास २५ हजार रुपयांची लाच घेताना अटक…

पुणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागात करण्यात आली.
उमेश राजाराम कवठेकर (वय ५४) असे या मीटर रिडरचे नाव आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदार हे परवानाधारक प्लंबर आहेत. एका बांधकाम व्यावसायिकाला शिवाजीनगर, भांबुर्डा येथील मिळकतीसाठी पाणीपुरवठा विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घ्यायचे होते.
त्यासाठी तक्रारदार यांनी कर्वे रस्त्यावरील चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागात अर्ज केला होता. तक्रारदार पाणीपुरवठा विभागात गेले. त्यावेळी कवठेकर याने ना-हरकत प्रमाणपत्रासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने ‘एसीबी’च्या कार्यालयात अर्ज दिला.
अर्जाच्या पडताळणीत कवठेकर याने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी प्रत्येकी १० हजार रुपये आणि स्वत:साठी पाच हजार रुपये असे एकूण २५ हजारांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार ‘एसीबी’च्या पथकाने मंगळवारी (ता. ११) चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागात सापळा रचून कवठेकर याला लाच घेताना ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिली.
ही कारवाई ‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त अधीक्षक शीतल जानवे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे करीत आहेत.