आता राज्यात पुन्हा एकदा तेच तिकीट आणि तोच तमाशा!! आता शिंदे गटाचे आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात..

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे दहा आमदार शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा, खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ज्यांना मंत्रिपदे मिळाली नाहीत त्यातील अनेक जण आमच्या संपर्कात आहेत, असे राऊत म्हणाले.
दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत काही आमदार एकनाथ शिंदेंच्या अंगावर धावून गेले असं ऐकण्यात आलं, असाही खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
या वादाची धूळ खाली बसत नाही, तोच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
खासदार राऊत म्हणाले, आमच्या संपर्कात असलेल्या शिंदे गटातील आमदारांती नावे माझ्याकडे आहेत. पण नावं आताच सांगणार नाही. पण ते आमदार मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील आमदार आहेत.
जे मंत्रिपदावर डोळा ठेवून बसले होते, त्या आमदारांपैकी बहुतेक जण आहेत. ज्यांची मंत्रिपदे जाण्याची शक्यता आहे, ते ही कोलांटीउडी मारण्याच्या तयारीत आहेत.
आता मंत्रिमंडळ विस्तारात,तीन जणांचे वाटे होतील तेव्हा शिंदे गटाला फक्त दोन मंत्रिपदे येतील. बाकीच्यांना ताटकळत बसावे लागणार. याच मुद्यावरून त्यांच्या बैठकीत एकमेकांवर धावून जाण्याचे प्रकार सुद्धा झाले.
दरम्यान, बैठकीत शिवीगाळ झाल्याचंही ऐकण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अंगावरही काही जण धावून गेले असं सुद्धा ऐकलेलं आहे, नक्की मला माहिती नाही, असे देखील विनायक राऊत म्हणाले.