ब्रेकिंग! आता उद्धव ठाकरे हाजीर हो! शिवडी कोर्टाचे ठाकरे आणि संजय राऊतांना समन्स..

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत सध्या वाढ होताना दिसत आहे. मुंबईतील शिवडी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना समन्स बजावत बजावले आहे.

तसेच १४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत माहिती अशी की, खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात सामना मुखपत्रातून बदनामीकारक खोटी बातमी प्रसिद्ध केल्यामुळे शेवाळेंनी दाखल केलेल्या मानहानीच्या अर्जावर समन्स जारी केले आहे.
सामना मुखपत्राच्या आवृत्तीमध्ये प्रकाशित एका लेखात राहुल शेवाळे यांचे दुबई तसेच पाकिस्तानातील कराचीत रिअल इस्टेटमध्ये हितसंबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. यामुळे याची बरीच चर्चा झाली होती.

यावर शेवाळे यांनी नोटीस पाठवून या लेखातील दाव्यांचा स्रोत काय? अशी विचारणा केली होती. त्यावर, एका महिलेने इंटरनेटवर केलेला दावा आणि अन्य माहितीच्या आधारावर हा लेख लिहिल्याचे सामनाकडून सांगण्यात आले.
शेवाळेंनी दंडाधिकारी न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली आणि मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावाही दाखल केला आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना नोटीस बजावली आहे.