पुण्यातील दर्शना पवार खून प्रकरणी आता खळबळ उडवून देणारी माहिती आली समोर, तिच्या डोक्यावर आणि शरीरावर…

पुणे : पुण्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरुणीचा मृतदेह आढळ्याने खळबळ उडाली होती. दर्शना दत्तू पवार असे या मृत तरुणीच नाव असून ती नुकतीच एमपीएससी परिक्षेत पास झाली असून तिची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाल्याचेही माहिती मिळाली होती.

दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात तिच्या अंगावर जखमा आढळून आल्याने तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात वेल्हे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.
दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला त्याचबरोबर तिच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे तिची हत्याच झाली असल्याचा पोलिसांना संशय आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, दर्शना पवार आणि तिचा मित्र राहुल हांडोरे १२ जून रोजी दुचाकीवरून राजगड किल्ला परिसरात गेले होते. सकाळी सव्वासहाच्या सुमारास दोघे गडाच्या पायथ्याशी पोहचले. दोघांनी गड चढायला सुरुवात केली.
सकाळी दहाच्या सुमारस राहुल गडावरून एकटाच खाली आल्याचे धक्कादायक वास्तव राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही चित्रीकरणातून समोर आले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
तर तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता राहुलचे लोकेशन बाहेरच्या राज्यात असल्याचे समोर येत आहे. राहुल पसार झाल्यामुळे संशयाची सुई त्याच्याभोवती फिरू लागली आहे. जोपर्यंत तो ताब्यात मिळत नाही तोपर्यंत दर्शनाचा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला? हे समजू शकणार नाही.