महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा मोदींचा निर्धार; पण विरोधकांना थेट टोला! डिलिमिटेशन विधेयकाआधी पंतप्रधानांचा मोठा संदेश


नवी दिल्ली : लोकसभेच्या जागा वाढणार, महिलांना संसदेत मोठे प्रतिनिधित्व मिळणार आणि त्याचवेळी राजकीय पक्षांमध्ये नव्या संघर्षाची ठिणगी पडणार? संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका व्हिडीओ संदेशामुळे राजधानीतील राजकीय वातावरण तापले आहे. मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका स्पष्ट करत मोदी यांनी ३३ टक्के आरक्षणाचे आश्वासन पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याचवेळी राष्ट्रीय हितापेक्षा पक्षीय हिताला प्राधान्य देणाऱ्यांनाही त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला.

देशाची प्रगती नारीशक्तीच्या स्वप्नांशी जोडलेली आहे, असे सांगत मोदी यांनी संसद आणि राज्य विधिमंडळांमध्ये महिलांना एकतृतीयांश प्रतिनिधित्व देण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. महिला आरक्षणाच्या मार्गातील अडथळे दूर केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राजकारणात महिलांना योग्य स्थान मिळावे यासाठी अनेक दशकांपासून लढा सुरू असून आपणही या प्रयत्नांचा भाग राहिलो असल्याचे त्यांनी नमूद केले.

मोदींचा विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा

भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी महिला सक्षमीकरणाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगताना मोदी यांनी काही राजकीय पक्षांवर निशाणा साधला. काहींसाठी स्वतःच्या पक्षाचे हित हेच सर्वस्व बनते आणि ते राष्ट्रीय हितापेक्षाही मोठे मानले जाते, अशी टीका त्यांनी केली. ‘नारी शक्ती वंदन’ ही घटनादुरुस्ती काळाची गरज असल्याचे सांगत देशाच्या भविष्यासाठी महिलांची स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले. देशातील महिलांचा आशीर्वाद सरकारच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसभेच्या ५४३ जागा थेट ८५० पर्यंत?

या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी मतदारसंघ पुनर्रचनेचा प्रस्ताव आहे. सध्या लोकसभेत ५४३ जागा आहेत. डिलिमिटेशननंतर ही संख्या सुमारे ८०० ते ८५० पर्यंत वाढवण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याची चर्चा आहे. या बदलासोबतच संसद आणि राज्य विधिमंडळांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी सरकारची भूमिका आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच महिलांना एकतृतीयांश जागांचे प्रतिनिधित्व मिळावे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे. संबंधित विधेयकांच्या मसुद्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने यापूर्वीच मंजुरी दिल्याची माहिती आहे.

२८ नोव्हेंबरलाही मोदींनी दिला होता संदेश

पंतप्रधानांनी २८ नोव्हेंबर रोजीही व्हिडीओ प्रसिद्ध करून महिला आरक्षणाबाबत सरकारची भूमिका मांडली होती. आरक्षणाला विरोध करणारे राजकीय पक्ष महिलांचा संसद आणि विधानसभांमधील सहभाग वाढवण्याच्या मार्गात अडथळा ठरू शकणार नाहीत, असे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, संसदेचे विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. लोकसभेचे कामकाज त्याच दिवशी सुरू होईल, तर राज्यसभेचे कामकाज २ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित सुधारित प्रस्ताव मांडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारच्या प्रस्तावांना विरोधक कसा प्रतिसाद देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर एकमत होणार की संसदेत नवा संघर्ष पेटणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!