घराबाहेर खेळणाऱ्या चिमुरडीला घरात बोलावलं, गुपित उघड केल्यास हात-पाय तोडण्याची धमकी! नागपुरात ६० वर्षीय शेजाऱ्याला अटक


नागपूर : शेजारी असल्याने घरच्यांचा विश्वास संपादन केला, पण त्याच विश्वासाचा गैरफायदा घेत एका ६० वर्षीय व्यक्तीने आठ वर्षांच्या चिमुरडीसोबत संतापजनक कृत्य केल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. मुलीला घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, हा प्रकार कोणाला सांगितल्यास हात-पाय तोडण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. धमकीमुळे चिमुरडी सुरुवातीला गप्प राहिली; मात्र अखेर तिने आईला सर्वकाही सांगितले आणि या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. नंदनवन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ओळखीचा असल्याने कुटुंबीयांचा विश्वास

नेहरू मारुती पाचरे (वय ६०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित मुलीच्या परिसरातच राहत होता. मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला आपल्या घरी बोलावल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिच्यासोबत लैंगिक गैरवर्तन केल्याची माहिती पोलिसांत दिलेल्या तक्रारीत आहे.

धमकीमुळे चिमुरडीने लपवली घटना

घडलेल्या प्रकाराबाबत कोणालाही सांगू नकोस, अन्यथा हात-पाय तोडून टाकीन, अशी धमकी आरोपीने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे चिमुरडी घाबरली होती. विशेष म्हणजे, आरोपीने यापूर्वीही अनेकदा तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर मुलीने धाडस करून आईला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. मुलीची आपबिती ऐकल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने नंदनवन पोलीस ठाणे गाठले.

पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

आईच्या तक्रारीनंतर नंदनवन पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर नेहरू मारुती पाचरे याला अटक करण्यात आली. यापूर्वीही आरोपीने मुलीसोबत असे कृत्य केले होते का आणि धमकी देऊन हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला का, याचा तपास पोलीस करत आहेत.

शेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडूनच असा गंभीर प्रकार घडल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. या घटनेने लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!