UPI ने ५०० रुपये पाठवले तरी मोबाईलवर मेसेज येणार नाही? HDFC बँकेचा मोठा निर्णय; १ जानेवारीपासून काय बदलणार?


मुंबई : भाजीपाला खरेदी असो, किराणा दुकानातील बिल असो किंवा मित्राला पैसे पाठवायचे असोत, आज अनेकजण अगदी छोट्या रकमेसाठीही यूपीआयचा वापर करतात. पैसे पाठवल्यानंतर खात्यातून रक्कम वजा झाल्याचा एसएमएस येताच व्यवहार पूर्ण झाल्याची खात्री होते. मात्र, आता एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना या सवयीत बदल करावा लागू शकतो. कारण बँकेने ५०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या यूपीआय व्यवहारांसाठी एसएमएस अलर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहे.

१०० ते ५०० रुपयांच्या व्यवहारांवर काय होणार?

नव्या निर्णयानुसार, एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांनी १००, २००, ४०० किंवा ५०० रुपयांचे यूपीआय पेमेंट केले, तर व्यवहाराची माहिती देणारा एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येणार नाही. मात्र, ग्राहकांना घाबरण्याचे कारण नाही. कारण या व्यवहारांसंदर्भातील ई-मेल सूचना बँकेकडून सुरूच ठेवल्या जाणार आहेत. म्हणजेच व्यवहाराची नोंद मिळेल, पण ती एसएमएसऐवजी ई-मेलवर पाहावी लागेल.

५०० रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांचे काय?

या निर्णयात मोठ्या रकमेच्या व्यवहारांना मात्र वेगळे ठेवण्यात आले आहे. ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेचे यूपीआय पेमेंट केल्यास ग्राहकांना पूर्वीप्रमाणे एसएमएस अलर्ट मिळत राहतील. त्यामुळे ५०० रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्यांच्या मोबाईलवरील संदेशसेवेत बदल होणार नाही.

RBI च्या नियमांमुळे बँकेचा निर्णय

रिझर्व्ह बँकेने इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांसाठीच्या अलर्टसंदर्भात सुधारित मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार, ५०० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या इलेक्ट्रॉनिक व्यवहारांसाठी बँकांना तातडीने एसएमएस सूचना देणे आवश्यक आहे. मात्र, ५०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांबाबत एसएमएस पाठवायचे की नाही, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य बँकांना देण्यात आले आहे.

एचडीएफसी बँकेने याच तरतुदीनुसार हा बदल केला असून, ग्राहकांना अधिसूचनेद्वारे माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, कमी रकमेच्या व्यवहारांसाठी एसएमएस अलर्ट सुरू ठेवण्याचा निर्णय एखाद्या बँकेने घेतला, तर त्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारता येणार नाही.

UPI पेमेंट बंद होणार का?

अजिबात नाही! या निर्णयाचा यूपीआय व्यवहार करण्याच्या सुविधेवर किंवा खात्यातून पैसे वजा होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होणार नाही. फक्त कमी रकमेच्या व्यवहारांनंतर येणारा एसएमएस बंद होईल. त्यामुळे एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांनी १ जानेवारी २०२७ पासून आपल्या ई-मेलकडेही लक्ष देणे आवश्यक ठरणार आहे. छोट्या पेमेंटचा एसएमएस अचानक येणे बंद झाल्यास व्यवहार झाला नाही, असा गैरसमज करून घेऊ नका.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!